उमरी तालुक्यात ‘प्रभारीराज’मुळे गैरसोय
By Admin | Published: June 28, 2017 12:18 AM2017-06-28T00:18:51+5:302017-06-28T00:29:00+5:30
उमरी : प्रयोग करणारे उपक्रमशील शेतकरी, सुपीक जमीन, सिंचनाच्या सोयी अशा सर्व सुविधा असल्या तरी कृषी खात्याकडे पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत़
बी.व्ही.चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी : मोठ्या संघर्षानंतर सन १९९९ साली अस्तित्वात आलेल्या उमरी तालुक्याला महत्त्वाच्या खात्यात अनेक वर्षांपासून प्रभारी कारभार चालत असल्याने प्रशासकीय कामे ठप्प झाली़ पर्यायाने जनतेची गैरसोय होत असल्याचे विदारक चित्र आहे.
कृषीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात वर्षानुवर्षे प्रमुख अधिकाऱ्यांचे पद रिक्त राहते़ जानवारी २०१६ पासून येथील पदभार धर्माबाद तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आहे़ तालुक्यातील शेतीचे क्षेत्र व होतकरू शेतकरी गट, पीक उत्पादनात नवनवीन प्रयोग करणारे उपक्रमशील शेतकरी, सुपीक जमीन, सिंचनाच्या सोयी अशा सर्व सुविधा असल्या तरी कृषी खात्याकडे पूर्णवेळ अधिकारीच नसल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत़
सद्य:स्थितीत अनेक कृषी योजना अर्धवट स्थितीत पडून आहेत़ उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे पद गेल्या आठ वर्षांपासून रिक्त आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्रभारी कार्यभार चालू आहे़ यामुळे वैद्यकीय सेवेबरोबर प्रशासकीय कामकाजावर याचा विपरीत परिणाम होत आहे़ नांदेड जिल्ह्यातील एक हेवी सेंटर म्हणून उमरीचे ग्रामीण रुग्णालय समजण्यात येते़ मात्र वैद्यकीय अधिकारी व प्रमुखांची पुरेशी सोय नसल्याने रुग्णांचे हाल होतात़ अंगणवाड्यांच्या कामकाजावर नियंत्रण असणारे एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी पद २ वर्षांपासून रिक्त आहे़ अगोदर लिपिकाकडे व नंतर आता प्रभारी बीडीओकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला़ एक वर्षापासून आहारभत्ता नाही, कार्यकर्ती, मदतनिसांचे मानधन ३ महिन्यापासून नाही, कर्मचाऱ्यांची प्रवासभत्ता बिले नाही, अशा अनेक समस्या या कार्यालयाकडे आहेत़
तालुक्याच्या दोनशेपेक्षा अधिक ग्रामविकासाच्या योजना चालविणाऱ्या पं. स. बीडीओंचे पद गेल्या ९ महिन्यांपासून रिक्त आहे़ प्रभारी अधिकारी एम़ एऩ केंद्रे हे एकात्मिक बालविकास व पंचायत समितीचे बीडीओ अशा दोन्ही कार्यालयाचे कामकाज पाहतात़ महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रभारी आहेत़
तालुका भूमी अभिलेखचे उपअधीक्षक पद गेल्या १ वर्षापासून रिक्त असून मुदखेड येथील के़ एऩ जेठेवाड यांच्याकडे उमरीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला़
जलसंपदा, पशुवैद्यकीय, टपाल, दूरध्वनी इ. कार्यालयांच्या बाबत अशीच स्थिती आहे़ येथे अधिकारी राहत नाहीत व कर्मचारीही पुरेसे नाहीत़ अशा प्रकारे तालुक्याच्या कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणेची अवस्था पाहता, जनतेची कामे वेळेवर व सुलभरीत्या कशी होणार, हा एक प्रश्नच आहे़