ताब्यातील भूखंडाच्या चौकशी आदेशाने आमदार भुमरेंच्या अडचणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 05:42 PM2019-09-25T17:42:20+5:302019-09-25T17:43:31+5:30
मोठ्या नेत्यांनी जागा घेतल्या, मग मी घेतली तर काय झाले
औरंगाबाद : पाचोड येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या नावावर आमदार संदीपान भुमरे यांनी ताब्यात घेतलेल्या दोन एकर जमीनीची स्थळ पाहणी करून संबंधित जमिनीचे सर्व अभिलेख अहवालासह सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याने भुमरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अँड बद्रीनारायण भुमरे यांनी या जमिनीची कागदपत्रासह मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी सर्व शासकीय यंत्रणेकडे तक्रार केली आहे. आमदार संदिपान भुमरे यांनी पदाचा गैरवापर करून महसूल विभागाची दिशाभूल करून लहान भावाच्या शिक्षण संस्थेस ही जागा मिळवून दिली असा आरोप त्यांनी केला होता. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी फुलंब्री - पैठण चे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांना चौकशीचे आदेश दिले आहे.
तहसील कार्यालयातून संबंधित दस्तऐवज गायब
संबंधित जमीनीची नोंद कोणत्या कागदपत्राच्या आधारे सातबारा उताऱ्यावर घेण्यात आली तसेच ताबा पावती व पंचनामा बाबतचे कागदपत्रे पैठण तहसीलदार यांच्याकडे अँड बद्रीनारायण भुमरे यांनी मागितले असता याबाबतचे दस्तऐवज तहसील कार्यालयात उपलब्ध नसल्याचे तहसीलदार यांनी लेखी पत्रच दिले असल्याचे बद्रीनारायण भुमरे यांनी लोकमतला सांगितले.
मोठ्या नेत्यांनी जागा घेतल्या, मग मी घेतली तर काय झाले
जमीन हडपल्याचा आरोप झाल्यानंतर आमदार भुमरे यांनी दावरवाडी येथील जाहिर सभेतून बोलताना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व पतंगराव कदम या दोन मोठ्या नेत्यांचे नाव घेऊन या नेत्यांनी सुध्दा शासकीय जागा घेतल्या असल्याचे सांगितले. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
पाचोड गावात हायवेलगत २ एकर जागा
भुमरे यांनी ताब्यात घेतलेली जागा पाचोडच्या हायवे लगत आहे. या ठिकाणी सात लाख रूपये गुंठा जमिन विक्रीचा भाव आहे. यानुसार दोन एकरचे ५ कोटी ६० लाख रूपये बाजारभाव असलेली. ही जमीन भुमरे यांनी २४ हजार रूपयात ताब्यात घेतली असल्याचा आरोप अँड बद्रीनारायण भुमरे यांनी केला आहे.