ताप रूग्णांत वाढ
By Admin | Published: September 19, 2014 11:54 PM2014-09-19T23:54:25+5:302014-09-20T00:06:02+5:30
नांदेड : वातावरणातील बदल व ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
नांदेड : वातावरणातील बदल व ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गत आठ महिन्यांत डेंग्यूचे २२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत़ तर साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त आहेत़ यासंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक भागात अळीनाशक औषधी फवारणी करण्यात आली नाही़
शहरात स्वच्छतेच्या कामाचा बोजवारा उडाल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत़ तुंबलेल्या नाल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी येत आहे़ त्यामुळे डासांची उत्पती निर्माण होवून साथरोगांना निमंत्रण मिळत आहे़ अनेक भागातील लहान मुले, जेष्ठ नागरिकांना साथीचे आजार होत आहेत़ ताप, सर्दी, खोकला या आजाराने नागरिक त्रस्त आहेत़ गेल्या काही महिन्यापासून डेंग्यूने डोके वर काढले आहे़ आतापर्यंत २२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे नोंद शासकीय रूग्णालयात आहे़
यातील काही रूग्ण बरे झाले असून एका रूग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ़ मीरा कुलकर्णी यांनी दिली़ त्या म्हणाल्या, सध्या वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग आढळून आले आहेत़ महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात हिवताप व डेंग्यू आजारांचा प्रचार टाळण्यासाठी प्रभागनिहाय अळीनाशक औषधी फवारणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ डेंग्यूचे रूग्ण आढळलेल्या भागात धुर व औषधी फवारणी करण्यात येत आहे़ तसेच कंटेनर पाहणी मोहीमही सुरू आहे़ स्वयंसेवक घरोघर भेटी देवून नागरिकांच्या घरातील पाणीसाठे तपासणी करत आहेत़ घरातील कुलर, टायर, सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत़ त्यामुळे अशा पाणीसाठ्यावर डासांची निर्मिती होवून साथीचे आजार बळावत आहेत़ यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे़
डॉ़ प्रमोद अंबाळकर म्हणाले, शहरात सध्या विषाणूजन्य आजारांचे रूग्ण वाढले असून गॅस्ट्रो, डेंग्यू, कावीळ, मलेरीया आदी आजारामुळे रूग्णालयात गर्दी होत आहे़ विशेषत: ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या अधिक असून शहरातील अविकसीत भागात डेंग्यूचे रूग्ण वाढले आहेत़ महिन्यातून दोन, तीन रूग्ण डेंग्यूचे आढळत आहेत़ या रूग्णांना शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)