खरीप हंगामासाठी पीक कर्जाच्या रकमेत वाढ; कापसाला प्रति एकर ४० तर तुरीला २४ हजार रुपये
By बापू सोळुंके | Published: May 27, 2024 11:45 AM2024-05-27T11:45:02+5:302024-05-27T11:45:49+5:30
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दरवर्षी खरीप हंगामासाठी शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी बँकांकडे धाव घेत असतात.
छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मागेल त्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना विविध बँकांना दिले आहेत. केवळ ३ टक्के दराने पीककर्ज शेतकऱ्यांना मिळते. यामुळे दरवर्षी खरीप हंगामासाठी शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी बँकांकडे धाव घेत असतात. यावर्षी शासनाने विविध प्रमुख पिकांच्या कर्ज मर्यादेत वाढ केल्याचे दिसून येते. यात कपाशीच्या पिकासाठी प्रति एकर जास्तीत जास्त ४० हजार १५० तर तूर पिकाला २४ हजार ४६५ रुपये पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासते. शेतकऱ्यांना विशेष कार्यकारी सहकारी सोसायटींकडून मिळणारे पीककर्ज अत्यल्प असते. बऱ्याचदा बँकाही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे दार ठाेठावण्याशिवाय पर्याय नसतो. यातून त्यांची आर्थिक पिळवणूक होते. असे प्रकार टाळण्यासाठी मागेल त्या शेतकऱ्यांना अल्प दराने पीककर्ज देण्याचे निर्देश शासनाने जिल्हा सहकारी बँकेसह ग्रामीण बँकांना दिले. एवढेच नव्हे तर २०२४-२५ वर्षातील विविध पिकांसाठी प्रति एकरी जास्तीत जास्त किती कर्जपुरवठा करावा, याविषयी परिपत्रकच जारी केले आहे.
उसाला सर्वाधिक पीककर्ज
ऊस हे वार्षिक पीक म्हणून ओळखले जाते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकर ७३ हजार ८० रुपये पीककर्ज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गतवर्षी हा दर ६३ हजार ३६० रुपये होता. कापूस हे देखील नगदी पीक म्हणून ओळखले जाते. कापसाच्या पीककर्जात ३० टक्के वाढ करण्यात आली.
या पिकांची कर्जमर्यादा घटविली
यावर्षी शासनाने काही पिकांची कर्जमर्यादा कमी केल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने खरीप हंगामातील ज्वारीच्या पीककर्जात १८ टक्के तर जिरायती बाजरीच्या पीककर्ज मर्यादेत १०.७८ टक्के घट करण्यात आली. बागायती मूग, उडीद, भात, सूर्यफूल जिरायती, रब्बी ज्वारीच्या पीककर्जाची मर्यादा घटविण्यात आली आहे.
पिकाचे नाव----- यावर्षी किमान पीककर्ज- गत वर्षीचे पीककर्ज मर्यादा
कापूस बागायती---- ४०१५०-------- ३०६८०
कापूस जिरायती- ३०२५०------२६३६०
बाजरी बागायती-१९९५०-------१७६८०
बाजरी जिरायती- १२७०५-------११६८०
मका बागायती-२९१५०------२१३२०
मका जिरायती- १९८००-----१५०००
तूर--२४४६५----------२१७२०
मूग--१११३०-----१११२०
उडीद---१११३०----११४००
भुईमूग-- २३४१५---२०२८०
भुईमूग- जिरायती-२०१६०--- १९६००
सोयाबीन-- २६०४०-- २४३६०
सूर्यफूल- १५१२०-- १४०००