मालमत्ता करात होणार वाढ

By Admin | Published: March 17, 2016 12:15 AM2016-03-17T00:15:35+5:302016-03-17T00:16:33+5:30

परभणी : महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आगामी वर्षात मालमत्ता कर, गाळे भाडेवाढ आणि लिलावाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत़

Increase in Property Taxes | मालमत्ता करात होणार वाढ

मालमत्ता करात होणार वाढ

googlenewsNext

परभणी : महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आगामी वर्षात मालमत्ता कर, गाळे भाडेवाढ आणि लिलावाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत़ त्यामुळे आगामी वर्षात मालमत्ता करामध्ये वाढ होण्याची चिन्हे बुधवारी महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले़ येथील बी़ रघुनाथ सभागृहात स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचा १७ लाख ५० हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले़
१६ फेब्रुवारी रोजी बी़ रघुनाथ सभागृहात महापालिकेच २०१६-१७ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले़ या प्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश देशमुख यांच्यासह आयुक्त राहुल रेखावार, मुख्य लेखाधिकारी अनिल गिते, नगरसचिव चंद्रकांत पवार, लेखाधिकारी एम़बी़ राठोड, सहाय्यक लेखाधिकारी भगवान राठोड, केशव दौंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती़ मुख्य लेखाधिकारी गिते यांनी अर्थसंकल्पाची माहिती सभागृहाला दिली़
२०१५-१६ चे वार्षिक अंदाजपत्रक ५७५ कोटी २० लाख रुपयांचे होते़ त्यातून ५७५ कोटी ३ लाख रुपयांचा खर्च झाला असून, १७ लाख ५० हजार रुपये मागील शिल्लक आहे़ २०१५-१६ च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार अखेरची शिल्लक ४९ कोटी ९७ लाख रुपये असून, यातून विकास कामे व योजनांच्या खर्चाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार असल्याचे सभागृहासमोर सांगण्यात आले़
२०१६-१७ या आगामी वर्षासाठी महापालिकेला १२९ कोटी ८९ लाख रुपये महसुली विभागातून मिळणार आहेत़ तर भांडवली जमा १४५ कोटी ७९ लाख रुपये होईल, असा मनपाचा अंदाज आहे़ मागील वर्षीची ४९ कोटी ९७ लाख रुपये ही रक्कम शिल्लक असून, ही सर्व रक्कम मिळून महापालिकेच्या खात्यात वर्षभरामध्ये ३३२ कोटी १२ लाख रुपये जमा होणार आहेत़ या रकमेपैकी महापालिकेने ११९ कोटी १४ लाख रुपये महसुली खर्चासाठी प्रस्तावित केले असून, भांडवली खर्चासाठी २०६ कोटी ६६ लाख रुपये प्रस्तावित केले आहेत़ एकूण ३३२ कोटी १ हजार रुपयांचा एकूण खर्च वर्षभरात होणे गृहित धरले असून, ११ लाख ७९ हजार रुपये शिल्लक राहणार आहेत़ महापालिकेला महसुली रकमेत आगामी वर्षात ३ कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे़ त्यात स्थानिक संस्था कराचे पूनर्मूल्यांकन करून व्यापाऱ्यांकडून येणारी रक्कम आणि शहरातील वाढत्या मालमत्तांची संख्या लक्षात घेता हे उत्पन्न मिळणार आहे़ तसेच इमारत भाड्यातून ६ कोटी, भूखंड लिलावातून ५ कोटी, शॉपिंग कॉम्प्लेक्स खाजगी तत्त्वावर दिल्याने १० कोटी आणि वीज कंपनीला दिलेल्या जमिनीचा मोबदला १० कोटी रुपये मनपाला महसुली उत्पन्नात मिळणार आहे़
आगामी वर्षातील प्रस्तावित योजनांमध्ये पाणीपुरवठ्यावर १३ कोटी ८६ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे़ सार्वजनिक आरोग्य व सुविधेसाठी १४ कोटी २ हजार रुपये, अग्नीशमन आणि दिवाबत्तीसाठी २२ कोटी ९६ लाख तर महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते यासाठी २७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे़ तर भांडवली उत्पन्नातून मिळणाऱ्या निधीचा विनियोगही मनपाने केला आहे़ (प्रतिनिधी)
मनपावर कर्जाचा डोंगर
महापालिकेने विविध कारणांसाठी १२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, हे कर्ज फेडणे बाकी आहे़ तसेच पूर्णा पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाची ८८ कोटी ६३ लाख रुपये थकबाकी भरणे शिल्लक आहे़ पथदिव्याचे वीज बिल १४ कोटी ५० लाख रुपये तर अभय योजनेतील ४ कोटी ७४ लाख रुपये भरणे शिल्लक आहे़ नोव्हेंबर महिन्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मिळणारे सहाय्यक अनुदान बंद होणार आहे़
‘प्रस्तावित निधीचा पाठपुरावा व्हावा’
मागील दोन वर्षांपासून महापालिकेचा अर्थसंकल्प फुगवून सादर केला जातो़ प्रस्तावित निधी आणि खर्च याविषयी पाठपुरावा होत नाही़ परंतु, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कमी खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला़ ही चांगली बाब आहे़ प्रस्तावित अर्थसंकल्पानुसार कामे व्हावीत, अशी अपेक्षा नगरसेवक उदय देशमुख यांनी व्यक्त केली़
तसेच आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मिळणारे सहाय्यक अनुदान बंद होणार आहे़ त्यामुळे मनपाची आर्थिक स्थिती आणखी खालावू शकते़ ही बाब लक्षात घेऊन मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे़, असे त्यांनी सांगितले़

Web Title: Increase in Property Taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.