सुरक्षित प्रसूतीचा आलेख उंचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:39 AM2017-07-23T00:39:39+5:302017-07-23T00:44:01+5:30
नांदेड: जिल्ह्यात मागील चार वर्षांत संस्थापक प्रसूतीत सातत्याने वाढ होत असून हा आलेख ९० टक्क्यांवर गेला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यात मागील चार वर्षांत संस्थापक प्रसूतीत सातत्याने वाढ होत असून हा आलेख ९० टक्क्यांवर गेला आहे़ गरोदरपण व प्र्रसूतीशी संबंधित गुंतागुंतीमुळे होणाऱ्या मातांचे मृत्यू टाळण्यात नांदेड जिल्हा आघाडीवर आहे़
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा प्रमुख उद्देश हा मातामृत्यू कमी करणे हा असून यासाठी जिल्ह्यामध्ये मातांना द्यावयाच्या विविध सेवा व योजनेमध्ये प्रगती केली आहे़ मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली़ त्यामध्ये संस्थापक प्रसूती वाढविणे, जननी शिशुसुरक्षा योजनेचा लाभ देणे, मानव विकास कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांची तपासणी शिबिरे व बुडीत मजुरीचा लाभ देणे, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत अतिजोखमीच्या मातांची काळजी व उपचार देणे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान मिशन इंद्रधनुष्यची अंमलबजावणी करणे यााबाबतचा आढावा घेण्यात येतो़
गरोदर मातेची प्रसूती सुरक्षित होऊन बालक व मातांना कमीत कमी ४८ तास निगराणीखाली ठेवता यावे, यासाठी जिल्ह्यात डिलिव्हरी पॉर्इंटसचे बळकटीकरण करण्यात आले आहे़ त्यानुसार जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या ठिकाणी बाळंतकक्ष बांधण्यात आले आहेत़ त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध सोयीसुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत़
नांदेड जिल्ह्यात मागील चार- पाच वर्षांत मातांचे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे़ जिल्ह्यात २०११ मध्ये ४२, २०१२ मध्ये ३९, २०१४ मध्ये ५१, २०१५ मध्ये ५३ मातांचे मृत्यू झाले़ जिल्ह्याचा जननदर कमी करण्यासाठी कुटुंबकल्याण कार्यक्रम प्रभाविपणे राबविणे गरजेचे असते़ त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये मागील ३ वर्षांपासून सर्व आरोग्य कार्यक्रमांचे सर्व पातळीवरून प्रभाविपणे संनियंत्रण व योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे़
गरोदर मातांना द्यावयाच्या सेवामध्ये धनुर्वात प्रतिबंधक लस, लोहयुक्त गोळ्या वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे यांनी सांगितले़