पक्षाची ताकद वाढवा, रिपाई महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका भाजपसोबत युतीमध्ये लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 01:27 PM2022-02-25T13:27:44+5:302022-02-25T13:28:40+5:30

Ramdas Athwale: वाॅर्डा-वाॅर्डांत, गावा-गावांत पक्ष मजबूत करण्यासाठी जनसंपर्क वाढवावा.

Increase the strength of the party, RPI Municipal Corporation, Zilla Parishad elections will be fought in alliance with BJP: Ramdas Athwale | पक्षाची ताकद वाढवा, रिपाई महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका भाजपसोबत युतीमध्ये लढणार

पक्षाची ताकद वाढवा, रिपाई महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका भाजपसोबत युतीमध्ये लढणार

googlenewsNext

औरंगाबाद : आगामी जि. प., पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका भाजपसोबत युतीमध्ये लढल्या जातील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी इतर समाजाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करावा. भाजपचे (BJP) निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांच्या संपर्कात राहून त्यांच्यासोबत नियमित चर्चा करावी, अशा सूचना रिपाइंचे केंद्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale ) यांनी बुधवारी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या.

मराठवाडा पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी खडकेश्वर येथे झाली. अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम होते. या बैठकीस मिलिंद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे, विजय सोनवणे, डॉ. सिद्धार्थ भालेराव, डी. एम. दाभाडे, संजय बनसोडे, परमेश्वर साळवे, राजाभाऊ ओहोळ, मिलिंद शिरढोणकर, दिवाकर माने, डॉ. विजय गायकवाड, अरविंद अवचरमल, संजय ठोकळ, नागराज गायकवाड आदींसह सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आठवले म्हणाले, आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका भाजसोबत युती करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पूर्ण ताकदीने लढणार आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. वाॅर्डा-वाॅर्डांत, गावा-गावांत पक्ष मजबूत करण्यासाठी जनसंपर्क वाढवावा. लोकांची कामे करा. लोकांना विश्वास देऊन बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्षवाढीच्या दृष्टीने काम करावे. भाजपचे निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांसोबत नियमित चर्चा करावी. त्यांना निवडून येणारी गावे, वाॅर्ड, गट, गणांच्या याद्या द्याव्यात. बैठकीचे सूत्रसंचालक दिलीप पाडमुख यांनी केले, तर शहराध्यक्ष किशोर थोरात यांनी आभार मानले. यावेळी बाळकृष्ण इंगळे, प्रशांत शेगावकर, मधुकर चव्हाण, प्रकाश गायकवाड, लक्ष्मण हिरावळे, विजय मगरे यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

लवकरच जिल्हा, शहर कार्यकारिणी बरखास्त
येत्या दोन महिन्यांत मराठवाड्यातील सर्व जिल्हा व शहर कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी तयार केल्या जातील. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. सर्वसमावेशक पक्ष तयार करण्यासाठी इतर समाजाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, ‘एकच लक्ष, रिपब्लिकन पक्ष’ या घोषणेनुसार सदस्यता नोंदणी पूर्ण करावी. सदस्य नोंदणीची पावतीपुस्तके राज्य कार्यालयात जमा करावीत. सदस्य नोंदणीचा आढावा घेतल्यानंतरच उमेदवारी व कार्यकारिणीमध्ये स्थान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना रामदास आठवले यांनी बैठकीत दिल्या.

Web Title: Increase the strength of the party, RPI Municipal Corporation, Zilla Parishad elections will be fought in alliance with BJP: Ramdas Athwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.