मांजरा धरणाच्या पाणीपातळीत वाढ
By Admin | Published: June 24, 2017 12:17 AM2017-06-24T00:17:28+5:302017-06-24T00:20:35+5:30
अंबाजोगाई : जून महिन्यात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात ४ द.ल.घ.मी.ने वाढ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : जून महिन्यात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात ४ द.ल.घ.मी.ने वाढ झाली. मांजरा धरणाचा पाणीसाठा सप्टेंबर ते आॅक्टोबर या महिन्यात वाढतो. मात्र, पहिल्याच पावसात ही किमया साध्य झाल्याने शेतकऱ्यांसह गावोगावी होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे.
धनेगाव येथील मांजरा धरणावरून अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, लातूर, लातूर एम.आय.डी.सी. यांच्यासह परिसरातील चाळीस गावांच्या पाणीपुरवठ्याची मदार मांजरा धरणावर आहे. या शिवाय शेतीला सिंचनासाठी पाणी मांजरा धरणातून सोडले जाते. तब्बल ४ वर्षांच्या दुष्काळी स्थितीनंतर गेल्या वर्षी मांजरा धरण तुडुंब भरले. यामुळे पाणीपुरवठा योजनांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला होता. मांजरा धरणात पाणीप्रवाह सुरू झाल्यामुळे आता थोडा जरी पाऊस पडला तरी पाण्याचा प्रवाह थेट धरणाकडेच येतो. त्यामुळे पडणारा पाऊस पाणीपातळीत वाढ होण्यासाठी सुकर ठरणारा आहे.