पासपोर्ट काढण्यासाठी ओघ वाढला; अर्ज केलाय तर दीड महिना थांबा...

By साहेबराव हिवराळे | Published: April 21, 2023 03:32 PM2023-04-21T15:32:15+5:302023-04-21T15:33:16+5:30

दिवसाला फक्त ८० जणांच्याच होतात मुलाखती; अधिकाऱ्यांसमोर मुलाखतीची प्रतीक्षा यादी वाढली

Increased flow of passport application; If you apply, wait for one and a half month... | पासपोर्ट काढण्यासाठी ओघ वाढला; अर्ज केलाय तर दीड महिना थांबा...

पासपोर्ट काढण्यासाठी ओघ वाढला; अर्ज केलाय तर दीड महिना थांबा...

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर :पासपोर्ट नोंदणीनंतर दररोज ऑनलाइन मुलाखतीसाठी ८० अर्जदारांच्याच मुलाखती होत आहेत. विलंब झाला की, पुन्हा पुढच्या तारखेची ऑनलाइन तारीख तुमच्या मोबाइलवर कळविली जाते. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. टपाल कार्यालयात पासपोर्ट सुविधा केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, त्यास पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला; परंतु सेवासुविधांत भर पडलेली नाही.

वर्षभरात १३ हजारांवर नागरिकांना पासपोर्ट देण्यात आला आहे. शहरात व्यापार तसेच पर्यटनाच्या वाढत्या सफरीमुळे पासपोर्ट अपडेट करणे किंवा नवीन काढण्यात पालकांसह विद्यार्थीही अग्रेसर आहेत. अनेकांना नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी येत असल्याने ऑनलाइन अर्ज करून पासपोर्ट काढण्याच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे.

स्वत:च भरा अर्ज आणि मिळवा पासपोर्ट
‘तात्काळ’साठी वेगळे शुल्क भरावे लागत असून, अर्ज करताना संगणकाच्या स्क्रीनवर कागदपत्रांची यादी येते, त्याची पूर्तता केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही. संगणकावर अर्ज केल्यावर पासपोर्टची ऑनलाइन मुलाखतीची दिनांक व वेळ मोबाइलवर कळवली जाते. त्या ठरलेल्या दिवशीच व वेळेवर दाखल केलेल्या कागदपत्रासह कार्यालयात दाखल होणे गरजेचे आहे. मुलाखत झाल्यावर पोलिसांकडून पडताळणीदेखील होते आणि त्यानंतर आठ ते पंधरा दिवसांत पासपोर्ट घरपोच येतो; परंतु अधिकाऱ्यांसमोर मुलाखतीची प्रतीक्षा यादी वाढलेली आहे.

विलंब कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु
पासपोर्ट लवकर मिळण्यासाठी इतरही जिल्ह्यांतील नागरिक ऑनलाइन अर्ज करून येथे सेवाकेंद्राचे नामनिर्देश करतात. त्यामुळे ‘वेटिंग’ वाढलेले आहे. अन्यथा छत्रपती संभाजीनगरवासीयांना आठ ते पंधरा दिवसांतच पासपोर्ट पाठविला जातो. पोस्टाचेही कर्मचारी मदतीला आहेत. विलंब कसा कमी होईल, याचा वरिष्ठांशी बोलून निर्णय घेता येईल.
- अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

Web Title: Increased flow of passport application; If you apply, wait for one and a half month...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.