करमाड येथील केंद्रावर डाळिंबाची वाढली आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:04 AM2021-07-25T04:04:21+5:302021-07-25T04:04:21+5:30
करमाड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजार पेठेत डाळिंबाची आवक वाढली आहे. डाळिंबाला भावही चांगला मिळत असल्याने ...
करमाड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजार पेठेत डाळिंबाची आवक वाढली आहे. डाळिंबाला भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा करमाड बाजारपेठेकडे वाढत आहे. मात्र, सध्याच्या वातावरणाचा डाळिंबावर विपरीत परिणाम झाला असून, मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य जीवाणूचा हल्ला झाल्याने डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
करमाड परिसरात डाळिंब बागांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. या भागातील प्रत्येक बागायतदार शेतकऱ्यांकडे कमीत कमी तीनशे ते जास्तीत जास्त सहा हजार खोडापर्यंत डाळिंब बागा आहेत. करमाड येथे औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने सुसज्ज असे व्यापारी संकुल उभे केले आहे. दोन मोठमोठे सेल हॉल आहेत. त्यामुळे एकात डाळिंब तर दुसऱ्या सेल हॉलमध्ये टमाटे खरेदी-विक्रीचा व्यवहार चालतो. डाळिंब खरेदी-विक्रीला नुकताच प्रारंभ झाला आहे. करमाड बाजारपेठेत चांगलीच आवक वाढली आहे. शनिवारी (दि २४) करमाड उपबाजारपेठेत जवळपास २२०० कॅरेट डाळिंब शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणले होते. कॅरेटला नाशिकप्रमाणेच म्हणजे अकराशे ते सोळाशे रुपये प्रति कॅरेट भाव मिळाला. दररोज रोख रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा करमाडकडे वळला आहे.
करमाड उपबाजार पेठेत येणारे डाळिंब चांगल्या दर्जाचे आहेत, येथे व्यापारी आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना रोज नगदी पैसे मिळू लागले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगल्या सुविधा निर्माण करून दिल्या आहेत.
- भरत सोनवणे, व्यापारी
फोटो कॅप्शन
करमाड येथील उपबाजार पेठेत विक्रीस आलेल्या डाळिंबाची अशा पद्धतीने छाटणी करताना.