घाटी रूग्णालयावर वाढला भार; महिन्याची ‘ओपीडी’ ४१ हजारांवर, तब्बल १२ जिल्ह्यातून येतात रुग्ण
By संतोष हिरेमठ | Published: August 25, 2023 01:30 PM2023-08-25T13:30:24+5:302023-08-25T13:31:27+5:30
शासकीय रुग्णालय घाटीतील डाॅक्टरांवर विश्वास, हे रुग्णवाढीमागे महत्त्वाचे कारण सांगितले जाते
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह जवळपास १२ जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयात रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. अवघ्या सात महिन्यांपूर्वी महिन्याकाठी ३२ हजार रुग्ण तपासणारी घाटी आता महिन्याला तब्बल ४१ हजार रुग्ण तपासते आहे. घाटीत रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. परंतु अनेक सोयीसुविधा ५० वर्षे जुन्या आहेत. डाॅक्टरांपासून परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी पडते आहे. औषधी तुटवडा तर कायमच आहे. या परिस्थितीला सामोरे जात रुग्णसेवेचा रथ येथील डाॅक्टर्स, परिचारिका, कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासन ओढत आहे.
का वाढले घाटीत रुग्ण?
घाटीतील डाॅक्टरांवर विश्वास, हे रुग्णवाढीमागे महत्त्वाचे कारण सांगितले जाते. गोरगरीब रुग्ण पूर्वीही येत आणि आताही येतात. गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढली आहे. दळणवळणाची साधने म्हणजे अगदी दुचाकीपासून तर रेल्वे, बसची सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे लवकर घाटीत पोहोचता येते. ‘रेफर’चे प्रमाणही अधिक आहे.
अशी वाढली घाटीत ओपीडी (२०२३)
महिना- रुग्णसंख्या
जानेवारी - ३२,५८८
फेब्रुवारी - ३४, ०९२
मार्च- ३३,३८१
एप्रिल- २६,९८६
मे- ३८,४६३
जून- ३८,१७९
जुलै- ४१,००३
११७७ खाटांवर महिन्याला ५ हजारांवर रुग्ण
घाटी रुग्णालयात ११७७ खाटा आहेत. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक रुग्ण दाखल असतात. त्यामुळे जमिनीवर गादी टाकूनही रुग्णांवर उपचार करावे लागतात. महिनाभरात ५ हजारांवर रुग्ण आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दाखल होतात.
सात महिन्यांत किती जणांचा मृत्यू?
घाटीत गेल्या सात महिन्यांत २९५९ रुग्णांचा मृत्यू झाला. रोज १० ते १५ आणि महिन्याला जवळपास ४०० रुग्णांचा मृत्यू होतो. यात गंभीर रुग्णांचे, अपघातग्रस्तांचे प्रमाण अधिक आहे.
किती या शस्त्रक्रिया?
घाटीत जानेवारी ते जुलै या कालावधीत ५ हजार ७९३ मोठ्या तर तब्बल १३ हजार ८३४ किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या.
१४ वर्षांत काय बदल?
तपशील- १४ वर्षांपूर्वी (२००९)- २०२२
ओपीडी-१,३३,७७९- ४,७१,७७६
आयपीडी-२२,८७२-७२,९३८
विभाग- २१-२३
इमारती-५-१०
घाटीतील मनुष्यबळ
पद-मंजूर पदे- उपलब्ध मनुष्यबळ
-अध्यापक डाॅक्टर्स -३५०-२७४
- निवासी डाॅक्टर्स- ५४९-५४९
- नर्सिंग, पॅरामेडिकल स्टाफ- १,५०६-९८२
- वर्ग -४ कर्मचारी- ८६८-५५६