कोरोनापाठोपाठ ‘म्युकरमायकोसिस’चे वाढते संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:02 AM2021-05-24T04:02:06+5:302021-05-24T04:02:06+5:30

औरंगाबाद : दात दुखतोय, हिरड्या सुजल्या म्हणून उपचारांसाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय गाठल्यानंतर तब्बल २२ जणांना ‘म्युकरमायकोसिस’चे निदान ...

Increased risk of mucorrhoea followed by corona | कोरोनापाठोपाठ ‘म्युकरमायकोसिस’चे वाढते संकट

कोरोनापाठोपाठ ‘म्युकरमायकोसिस’चे वाढते संकट

googlenewsNext

औरंगाबाद : दात दुखतोय, हिरड्या सुजल्या म्हणून उपचारांसाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय गाठल्यानंतर तब्बल २२ जणांना ‘म्युकरमायकोसिस’चे निदान झाले. या सर्व २२ जणांना कोरोना होऊन गेलेला होता. परंतु, आता त्यांना ‘म्युकरमायकोसिस’ने गाठले. हीच स्थिती अनेकांची आहे. जिल्ह्यात तब्बल २२८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. कोरोनापाठोपाठ आरोग्य यंत्रणेपुढे आता ‘म्युकरमायकोसिस’चे आव्हान उभे राहिले आहे.

कोरोनावर उपचार सुरू असताना आणि उपचार घेऊन रुग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार आढळून येत आहे. बुरशीजन्य (फंगल इन्फेक्शन) जंतूमुळे हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले. कोरोना उपचारांदरम्यान स्टेराॅईडचा वापर, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या बाटल्यांमध्ये डिस्टील वॉटरऐवजी साधे पाणी वापरले, अनियंत्रित मधुमेह, रक्ताचे विकार यांसह अनेक कारणांनी म्युकरमायकोसिस होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दंतोपचारांसाठी शासकीय दंत महाविद्यालयात आलेल्या काहींना या आजाराचे निदान झाले. औरंगाबादेत सध्या २२८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. यात अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचाही समावेश आहे.

------

म्युकरमायकोसिस रुग्णांची स्थिती

घाटीत- ५४

खासगी रुग्णालयांत- १७४

------

एका रुग्णाला लागतात ४२ इंजेक्शन, आतापर्यंत मिळाले २८० इंजेक्शन

म्युकरमायकोसिसच्या एका रुग्णाला रोज तीन यानुसार १४ दिवसांत ४२ इंजेक्शन द्यावे लागतात. जिल्ह्याला आतापर्यंत २८० इंजेक्शन मिळाली. रुग्णसंख्येच्या तुलनेत इंजेक्शन अपुरी पडत आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा इंजेक्शन उपलब्धतेसाठी प्रयत्नशील आहे.

---

प्राथमिक अवस्थेतच खबरदारी घ्यावी

ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. या आजाराचे प्राथमिक अवस्थेतच निदान झाले पाहिजे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. आमच्याकडे दंतोपचाराला आलेल्या २२ जणांना ‘म्युकरमाकोसिस’चे निदान झाले.

-डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

---

इंजेक्शन उपलब्ध

‘म्युकरमाकोसिस’च्या रुग्णांसाठी इंजेक्शन उपलब्ध होत आहे. खासगी रुग्णालयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी करावी. पोस्ट कोविड रुग्णांमध्ये हा आजार आढळत आहे. रोज तीन आणि सलग १४ दिवस ४२ इंजेक्शन या रुग्णांना द्यावी लागतात. घाटीत ५४ आणि खासगी रुग्णालयांत १७४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

-डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

--

शासकीय दंत महाविद्यालयाने दिलेला सल्ला

- मास्क स्वच्छ आणि योग्य पद्धतीने वापरणे.

- जे कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांचे नाक बिटाडिनने स्वच्छ करणे.

-ऑक्सिजनच्या बाटल्यांमध्ये डिस्टील वॉटर वापरणे.

- पोस्ट कोविड रुग्णांनी बिटाडीनने गुळणी करणे.

- तोंडाची, नाकाची स्वच्छता राखणे, नियमित दात साफ करणे.

-----

मौखिक आरोग्य राखा

‘म्युकरमायकोसिस’ला काही प्रमाणात आळा घालता येऊ शकतो. त्यासाठी साखर नियंत्रित ठेवणे, नियमितपणे साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवावे. नाॅर्मल सलाईनने नियमितपणे नाक स्वच्छ करणे, तोंडाची निगा राखणे, हे महत्त्वाचे आहे. सूज आल्यानंतर तोंडात अ‍ॅसिडिक प्रक्रिया जास्त प्रमाणात सुरू होते. त्यासाठी बिटाडीन या औषधाने दिवसातून दोन ते तीन वेळा गुळणी करणे, नियमितपणे ब्रश करणे खूप उपयोगी पडू शकते. प्राथमिक अवस्थेत निदान झाले तर या आजाराची पुढील वाटचाल रोखता येते, असे इंडियन डेंटल असोसिएशनच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष डाॅ. अभिजित चपळगावकर म्हणाले.

Web Title: Increased risk of mucorrhoea followed by corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.