संगणक, लॅपटॉपचा वापर वाढला; मान, कंबर, मणकेदुखीने अनेक जण त्रस्त, काय काळजी घ्याल?
By संतोष येलकर | Published: January 17, 2024 11:16 AM2024-01-17T11:16:14+5:302024-01-17T11:20:02+5:30
मोबाइलचाही अतिवापर : मान, कंबर, मणकेदुखीने अनेक जण त्रस्त
छत्रपती संभाजीनगर : हल्ली लॅपटाॅप, संगणक आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. संगणकावर काम करताना आठ-आठ तास एकाच जागेवर बसून राहावे लागते. अशातूनच मान, कंबर, मणकेदुखीच्या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ ओढावत आहे. त्यामुळे थोडी काळजी घेतली तर हा त्रास दूर ठेवता येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
अस्थिरोगतज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये लॅपटाॅप, संगणकावर अनेक तास काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. संगणकाशिवाय अनेक कामे अशक्य झाली आहेत. त्यामुळे संगणकाचा वापर वाढला आहे. कार्यालयासह वर्क फ्राॅम होममध्येही संगणकावरच काम केले जाते. त्याच्या अतिवापरामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
संगणक, लॅपटॉप अतिवापराचे धोके काय?
पाठदुखी, मणकेदुखी : संगणक, लॅपटाॅपच्या अतिवापरामुळे पाठदुखी, मणकेदुखी उद्भवण्याचा धोका वाढतो.
मानदुखी : एकाच जागेवर सतत बसून संगणकावर काम केल्याने मानदुखीला सर्वाधिक सामोरे जावे लागते.
गुडघेदुखी : संगणकावर सलग काम केल्याने गुडघेदुखीचाही त्रास उद्भवतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
काय काळजी घ्याल?
तासाभरानंतर थोडा ब्रेक घ्या : संगणकावर सलग काम करताना किमान तासाभरानंतर थोड्या वेळेसाठी ब्रेक घेतला पाहिजे.
स्ट्रेचिंग करा : तासाभरानंतर ब्रेक घेतल्यानंतर स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मानेचा नियमित व्यायाम करा : घाटीतील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत म्हणाले की, संगणकावर काम करताना मान कमी वाकवली पाहिजे. तसेच नियमितपणे मानेचा व्यायाम करावा.
योग्य पद्धतीने बसावे
लॅपटाॅप, संगणकाचा अतिवापर आणि या गोष्टी वापरताना चुकीच्या पद्धतीने बसल्याने कंबरेचे आणि मानेचे दुखणे वाढते. असा त्रास घेऊन अनेक रुग्ण येतात. त्यामुळे संगणकावर काम करताना काही वेळेनंतर ब्रेक घेतला पाहिजे. स्ट्रेचिंग केले पाहिजे. त्यातून कंबरेला, मणक्याला आराम मिळतो. योग्य पद्धतीने बसून काम करावे.
- डॉ. चंद्रशेखर गायके, अस्थिरोगतज्ज्ञ व एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन