वाढते तापमान मोसंबीच्या मुळावर
By Admin | Published: April 6, 2016 12:16 AM2016-04-06T00:16:24+5:302016-04-06T00:47:47+5:30
जालना : जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्यावर जात आहे. परिणामी मोसंबी बाग पूर्णपणे धोक्यात आली आहे. मोसंबी बाग टिकवायची असतील
जालना : जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्यावर जात आहे. परिणामी मोसंबी बाग पूर्णपणे धोक्यात आली आहे. मोसंबी बाग टिकवायची असतील तर बहार घेणे टाळण्यासोबतच झाडांना लागलेली फळे काढून टाकण्याचे आवाहन तज्ज्ञ करीत आहेत. एकूणच वाढते तापमान मोसंबीच्या मुळावर आले आहे.
जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा जास्त मोसंबीचे क्षेत्र आहे. त्यात जालना, बदनापूर व अंबड तालुक्यांत हे क्षेत्र जास्त आहे. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही मोसंबी लागवडीकडे कल वाढत आहे. मात्र वाढती पाणीटंचाई व वाढलेले तापमान यामुळे मोसंबी बागा धोक्यात येत आहेत. गतवर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली नाही. फेब्रुवारी महिन्यातच विहिरी तसेच कूपनलिकांनी तळ गाठला. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी बहर घेणे सुरूच ठेवले आहे. कडक उन्हामुळे व पाणीटंचाई पाहता बहर नष्ट होण्यासोबतच बागाही धोक्यात येण्याची स्थिती आहे. बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील फळ अधिकारी एम.बी. पाटील म्हणाले, तापमान ४० अंशांवर जात आहे. यामुळे मोसंबीसह सर्वच पिकांना धोका निर्माण झाला आहे. जर मोसंबी बाग टिकवायचे असतील तर शेतकऱ्यांनी बहर घेऊ नये तसेच झाडाला लागलेली फळ काढून टाकावीत. जेणे करून पाणी कमी लागेल. झाडे जगतील. थोडक्यात शेतकऱ्यांनी फळांचा मोह टाळण्याचे आवाहन पाटील यांनी केले. झाडे जगविण्यासाठी आच्छादन करणे गरजेचे आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पाने कमी करावीत. आहे त्या पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा. फळबागांना ठिबकने रात्रीच पाणीपुरवठा करावा. (प्रतिनिधी)