वाहनवाढीने आरटीओ कार्यालय मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:51 PM2018-01-11T23:51:25+5:302018-01-11T23:51:33+5:30
वाहनांच्या वाढत्या संख्येने आरटीओ कार्यालय मालामाल होत आहे, औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना, बीडमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाहन नोंदणीत १५.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी अवघ्या ९ महिन्यांत २३६ कोटींचा महसूल आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत जमा झाला आहे. डिसेंबरपर्यंत तब्बल १२२ टक्के महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट कार्यालयाने पूर्ण केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वाहनांच्या वाढत्या संख्येने आरटीओ कार्यालय मालामाल होत आहे, औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना, बीडमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाहन नोंदणीत १५.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी अवघ्या ९ महिन्यांत २३६ कोटींचा महसूल आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत जमा झाला आहे. डिसेंबरपर्यंत तब्बल १२२ टक्के महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट कार्यालयाने पूर्ण केले आहे.
औरंगाबाद आरटीओ कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड अशी तीन जिल्हे आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या तीन जिल्ह्यांत ९० हजार ८८७ नव्या वाहनांची नोंद झाली होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ७६ हजार ८७३ वाहनांची नोंद झाली.
गतवर्षीच्या तुलनेत दर महिन्याला १ हजार ४० वाहनांची अधिक नोंदणी होत आहे. परिणामी महसुलामध्येही चांगलीच वाढ होत आहे. या तीन जिल्ह्यांतील वाहनांची संख्या १८ लाख ६२ हजार ९०८ वर पोहोचली आहे, तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या १२ लाख ६० हजार ७९२ इतकी आहे.
तीन जिल्हे मिळून २०१७-१८ या आर्थिक वर्षात २६९ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये डिसेंबरपर्यंत १९९ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते; परंतु यापेक्षा अधिक महसूल गोळा करण्याचा विक्रम विभागाने केला आहे. १२२ टक्के महसूल वसूल झाला आहे.
विशिष्ट नंबरला पसंती
मागील वर्षी ४ हजार ६५१ पसंती क्रमांकातून (चॉईस नंबर) ३ कोटी ६७ लाख रुपये प्राप्त झाले, तर २०१७ मध्ये ४ हजार १८० पसंती क्रमांक गेले. यातून ३ कोटी ४४ लाख १५ हजार रुपयांचा महसूल मिळाला, तर दंडाच्या माध्यमातून ५० कोटी २ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.
उद्दिष्ट पूर्ण
४वाहन नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. जवळपास १५.३० टक्के वाढ आहे. आरटीओ कार्यालय आणि विभाग दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल जमा करीत आहे, ही चांगली बाब आहे. मराठवाड्यातील हा विभाग उद्दिष्ट पूर्ण करण्यात सर्वात पुढे आहे.
-सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी