महिला व्यावसायिकासोबत दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासात अश्लील कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:35 IST2024-09-04T19:35:14+5:302024-09-04T19:35:42+5:30
संतप्त महिलेने विमानतळावर पोहोचताच डायल ११२ ला संपर्क करून पोलिसांना बोलावून घेतले

महिला व्यावसायिकासोबत दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासात अश्लील कृत्य
छत्रपती संभाजीनगर : महिला व्यावसायिकासोबत विमानात सहप्रवाशाने अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान २ सप्टेंबर रोजी इंडिगोच्या सायंकाळच्या विमानात हा प्रकार घडला. याप्रकरणी आसीफ खान अन्वर अहमद (३९, रा. कटकट गेट) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
५५ वर्षीय तक्रारदार महिला शहरातील नामांकित व्यावसायिक आहे. कामानिमित्त त्या दिल्लीला गेल्या होत्या. सहकाऱ्यांसोबत सोमवारी शहरात येण्यासाठी निघाल्या. दुपारी ४:४५ वाजता दिल्ली विमानतळावरून इंडिगो विमानाने उड्डाण घेतले. त्यांच्या मागच्या सीटवर आसीफ कंपनीच्या सहकाऱ्यांसोबत प्रवास करत होता. प्रवास सुरू होताच आसीफचा महिलेला स्पर्श झाला. सुरुवातीला चुकून स्पर्श झाल्याचे समजून महिलेने दुर्लक्ष केले. मात्र, छत्रपती संभाजीनगरात विमान उतरण्याच्या काही मिनिटे आधी पुन्हा सीटच्या पाठीमागून हात घालून त्याने स्पर्श केला. सातत्याने हा प्रकार घडत असल्याने महिलेने विमानातच आक्षेप घेत त्याला जाब विचारला.
विमानतळावर पोलिसांना बोलावले
संतप्त महिलेने विमानतळावर पोहोचताच डायल ११२ ला संपर्क केला. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी तत्काळ पथकाला पाठवले. महिलेने सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी आसीफला ताब्यात घेत ठाण्यात नेले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून आसीफला नोटीस बजावून सोडले. मूळ दिल्लीच्या जाफराबाद परिसरातील आसीफ नामांकित कंपनीत व्यवस्थापक आहे. शहरात कटकट गेट परिसरातील बारी कॉलनीत वास्तव्यास आहे.