खरंच, रस्ते फोडण्याची कटकट कायम बंद करणार; रस्त्याच्या कडेला एकच अंडरग्राऊंड पाईप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 01:30 PM2022-07-02T13:30:02+5:302022-07-02T13:30:36+5:30
तोडफोड कायमची बंद करण्यासाठी रस्त्यांच्या शेजारी ‘मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे’ टाकण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे.
औरंगाबाद : शहरात मागील काही वर्षांमध्ये २७४ कोटी रुपये खर्च करून प्रमुख रस्ते गुळगुळीत करण्यात आले. आणखी ५१७ कोटी रुपये खर्च करून अनेक रस्ते तयार करण्यात येणार आहेत. मात्र, अनेकदा रस्ते केबल टाकणे, गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी फाेडण्यात येतात. ही तोडफोड कायमची बंद करण्यासाठी रस्त्यांच्या शेजारी ‘मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे’ टाकण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे. पंतप्रधान गतीशक्ती अभियानाअंतर्गत या प्रकल्पासाठी निधी मिळविता येईल का? यासाठी प्रयत्न सुरू असून, सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपये या प्रकल्पाचा अंदाजे खर्च असेल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
शहरात सध्या दोन प्रभागांत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांच्या कडेला खोदकाम केले जात आहे. तसेच मोबाईल कंपन्यांतर्फे शहरात फायबर ऑप्टिक केबल टाकण्यात येतात. त्यासाठी महापालिका संबधित कंपनीकडून पैसे घेते. पण, रस्त्यांचे झालेले नुकसान मोठे असते. रस्त्यांचे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे’ची शहरात गरज आहे. मात्र, त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. पंतप्रधान गतीशक्ती अभियानाअंतर्गत यासाठी निधी मिळविता येईल का? यासाठी आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन) या जागतिक बँकेशी संलग्न असलेल्या संस्थेच्या प्रतिनिधीसोबत चर्चा झाल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. ही संस्था कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी महापालिकेला मदत करणार आहे.
८ जुलैला बैठक
शहरात ‘मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे’चे जाळे तयार करण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. या अनुषंगाने ८ जुलैला ‘आयएफसी’च्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे पाण्डेय यांनी नमूद केले.
एकाच ठिकाणी काय?
रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येणाऱ्या स्वतंत्र पाईपमध्ये ड्रेनेज, मोबाईल केबल, विद्युत केबल, जलवाहिन्या, गॅस पाईपलाईन, आदी मूलभूत सोयी सुविधांचे जाळे असेल.