औरंगाबादेत आजपासून बेमुदत ‘रिक्षा बंद’ आंदोलन; अनेक संघटनांचा सहभाग, प्रवाशांचे हाल
By संतोष हिरेमठ | Published: December 1, 2022 12:06 PM2022-12-01T12:06:03+5:302022-12-01T12:06:56+5:30
शहरातील जालना रोड , रेल्वेस्टेशन रोड, बाबा पेट्रोल पंपसह विविध भागात प्रवासी रिक्षा, शहर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
औरंगाबाद : मीटर कॅलिब्रेशनसाठी २८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, रिक्षाचालकांवर कलम २८३ खाली गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत, आदी मागण्यांसाठी औरंगाबाद रिक्षाचालक- मालक कृती समितीने आज, १ डिसेंबरपासून बेमुदत रिक्षा बंद पुकारला आहे. यात अनेक रिक्षाचालक सहभागी झाले असून, शहरात प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येते आहे.
शहरातील जालना रोड , रेल्वेस्टेशन रोड, बाबा पेट्रोल पंपसह विविध भागात प्रवासी रिक्षा, शहर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या बंदमध्ये किमान २५ हजार रिक्षांचा ‘चक्का जाम’ होईल, असा दावा अध्यक्ष सलीम खामगावकर यांनी केला आहे.
रिक्षा बंदच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयात बुधवारी दुपारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मीटर कॅलीब्रेशनसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर अनेक संघटनांनी बंदमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तरीही समितीत सहभागी जवळपास १५ संघटना संपात उतरल्या आहेत.