"माझं कुटुंब फोडून माझ्या पत्नीला विरोधात उभं केलं"; हर्षवर्धन जाधवांचा रावसाहेब दानवेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 03:58 PM2024-10-31T15:58:58+5:302024-10-31T16:05:57+5:30

Harshawardhan Jadhav : कन्नडमध्ये अपक्ष लढणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यात लढत होणार आहे.

Independent candidate Harshvardhan Jadhav will fight against his wife Sanjana Jadhav in Kannad assembly constituency | "माझं कुटुंब फोडून माझ्या पत्नीला विरोधात उभं केलं"; हर्षवर्धन जाधवांचा रावसाहेब दानवेंवर आरोप

"माझं कुटुंब फोडून माझ्या पत्नीला विरोधात उभं केलं"; हर्षवर्धन जाधवांचा रावसाहेब दानवेंवर आरोप

Chhatrapati Sambhaajeenagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभेच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. निवडणूक येताच शिवसेनेच्या  तिकिटावर निवडणूक लढवून संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांना आव्हान दिलं आहे. या सगळ्यामागे रावसाहेब दानवे असल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमध्ये अपक्ष लढणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या आहेत. भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या असलेल्या संजना जाधव शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, पतीविरुद्ध पतील उभं करण्याचे काम एका पक्षाने केलं असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच आमचं घर फोडण्यामागे रावसाहेब दानवे यांचा हात असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

"आमच्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून एका राजकीय पक्षाने तिकीट दिलं आहे. कुठेतरी या सगळ्या गोंधळाच्या पाठीमागे रावसाहेब दानवे आहेत. माझं घर फोडण्यात आलं. माझ्या विरोधात पत्नीला उभं करण्याचे काम केलं आहे त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. सगळेजण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहेत. माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणीचं उरलेलं नाही. त्यामुळे आता हे धर्मयुद्ध असून ठोकून काढू," असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी दिला.

हर्षवर्धन जाधव हे या आधी दोनदा आमदार झाले आहेत. २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेच्या संयुक्त उमेदवाराचा लोकसभेत २,८३,७९८ मते घेऊन पराभव करण्याचे ते मुख्य कारण बनले आहेत. हर्षवर्धन आणि संजना जाधव दोघेही मराठा आहेत आणि इथे मराठा समाजाचे वर्चस्व आहे. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत हेही रिंगणात आहेत. त्यामुळे ही तिरंगी लढत कोणते वळण घेते हे येणारा काळच सांगणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच पती-पत्नीमध्ये अशी थेट लढत होणार आहे. हर्षवर्धन यांचे वडील रायभान जाधव हे काँग्रेसचे आणि अपक्ष म्हणून तीन वेळा आमदार होते. त्यांना शेतात कृषी महर्षी म्हणून ओळखले जाते. हर्षवर्धन जाधव २००९ मध्ये मनसे आणि २०१४ मध्ये शिवसेनेचे आमदारही झाले. तसेच २०२९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीत महायुतीचे चारवेळा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवात त्यांचा मोठा वाटा असून दोघांमधील लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. मात्र २०२४ लोकसभा निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. त्यांना केवळ ३९,८२८ मते मिळाली. 
 

Web Title: Independent candidate Harshvardhan Jadhav will fight against his wife Sanjana Jadhav in Kannad assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.