औरंगाबाद लोकसभेत अपक्षांनी अडवली लाखांवर मते; तर ५ हजार ७२९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती

By विजय सरवदे | Published: June 6, 2024 07:56 PM2024-06-06T19:56:41+5:302024-06-06T19:57:56+5:30

या निवडणुकीत ‘नोटा’ला मिळालेल्या पसंतीच्या तुलनेत २९ अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते कितीतरी कमी आहेत.

Independents blocked lakhs of votes for Aurangabad Lok Sabha; So 5 thousand 729 voters preferred 'NOTA' | औरंगाबाद लोकसभेत अपक्षांनी अडवली लाखांवर मते; तर ५ हजार ७२९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती

औरंगाबाद लोकसभेत अपक्षांनी अडवली लाखांवर मते; तर ५ हजार ७२९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती

छत्रपती संभाजीनगर : या निवडणुकीत ३७ उमेदवारांत अपक्षांची संख्या ३२ एवढी आहे. मतदारसंघात कवडीचेही काम नसणाऱ्या अनेकांनी केवळ हौस म्हणून अपक्ष निवडणूक लढवली. असे असले तरी या सर्व अपक्षांनी १ लाख ७ हजार ५३२ मते अडवली. 

दरम्यान, हर्षवर्धन जाधव, सुरेंद्र गजभारे आणि रवींद्र बोडखे या तीन अपक्ष उमेदवारांनी दखलपात्र मते घेतली आहेत. अपक्ष २९ उमेदवारांपैकी काहींनी ५९३, तर कोणी हजार-बाराशे मते घेतली. यामध्ये १२ अपक्षांनी दोन हजारांहून अधिक मतदान घेतले. विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी गेल्या निवडणुकीत २ लाख ८३ हजार ७९८ मते घेऊन शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा वारु रोखला होता. मात्र, यावेळी जाधव यांची किमया चालली नाही. मतदारांनी त्यांना ३९ हजार ६५४ मतांवरच रोखले. दुसरे अपक्ष उमेदवार जे फारसे चर्चेतही नव्हते. ते सुरेंद्र गजभारे यांना १० हजार ७१९ मते मिळाली. रवींद्र बोडखे यांना ६ हजार २५०, संजय शिरसाट यांना ३ हजार ८०९ आणि सुरुवातीपासून प्रचार आणि होर्डिंगमध्ये आघाडीवर असलेले डॉ. जीवन राजपूत यांना मात्र, ३ हजार ७८८ मतांवरच समाधान मानावे लागले.

५७२९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती
दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नशीब अजमावत असलेल्या ३७ पैकी एकही उमेदवार सक्षम वाटला नाही म्हणून ५ हजारा ७२९ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. सन २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी नोटाला पसंती देणारे ८०० मतदार अधिक आहेत. गेल्या वर्षी ही आकडेवारी ४ हजार ९२९ एवढी होती. 

२९ अपक्ष उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मते
मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात आणि योग्य किंवा चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे राज्य घटनेने १८ वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. मात्र, एकही उमेदवार सक्षम नाही, असे वाटल्यास सन २०१४ पासून ‘ईव्हीएम’वर नोटाचा (नन ऑफ द अबोव्ह) पर्याय दिलेला आहे. अलीकडे ‘नोटा’चा वापर बऱ्यापैकी वाढतोय. या निवडणुकीत ‘नोटा’ला मिळालेल्या पसंतीच्या तुलनेत २९ अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते कितीतरी कमी आहेत.पहिल्या फेरीला १६० मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. त्यानंतर एकूण २७ फेऱ्यांपर्यंत प्रत्येक फेरीला किमान २०० ने ही आकडेवारी वाढत गेली आहे.

Web Title: Independents blocked lakhs of votes for Aurangabad Lok Sabha; So 5 thousand 729 voters preferred 'NOTA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.