भारतात केवळ ६ टक्के शेतमालावरच होते प्रक्रिया; जाणून घ्या अन्न प्रक्रिया उद्योगांतील आकर्षक संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 08:00 AM2020-08-23T08:00:48+5:302020-08-23T08:05:01+5:30
राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कर्ज योजना व अनुदान योजना तयार केलेल्या आहेत. त्यामधील महिला उद्योजकांसाठी विशेष योजना नुकतीच कार्यान्वित झाली आहे हे विशेष.
- दीपक भिंगारदेव
यावर्षी कोरोनामुळे जगामध्ये एकूण 25 करोड लोकांना भूकबळी जाण्याची शक्यता आहे. कारण कोरोनामुळे जगभरामध्ये अन्नधान्याची कमतरता जाणवत आहे. त्याउलट भारतामध्ये अन्नधान्य, फळ, भाज्या यांची कमतरता नसून उलट आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. आपण याचा उपयोग निर्यातीसाठी पण करू शकतो. मात्र, भारतामध्ये उत्पादन केलेल्या फक्त सहा टक्केच अन्नधान्य व फळ यावर प्रक्रिया केली जाते. हेच प्रमाण प्रगत देशांमध्ये जवळपास 90 टक्के पर्यंत जाते. आपल्याला याबाबत जागरूक राहून अन्न व फळ प्रक्रिया मध्ये जास्त प्रक्रिया करण्यावर भर द्यावा लागेल.
या वर्षी पण मान्सून चांगला असल्यामुळे शेती माल बऱ्यापैकी येणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था चांगली झाल्यामुळे ती आपोआप सगळ्यांना लाभ देते. आपल्याकडे अन्न व फळ प्रक्रिया तीन वेगवेगळ्या प्रकारे होत असते उदाहरणार्थ, प्राथमिक स्वरूपात, दाळमिल, पीठ तयार करणे हे येते तर बेकरी व रेडिमेड फूड हे येते. आता हे करण्यासाठी सुद्धा राज्य व केंद्र शासनातर्फे मोठ्या प्रमाणात क्लस्टरसाठी अनुदान दिल्या जाते. राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान आहे. शासनातर्फे मोठ्या प्रमाणात चांगल्या मशीन विकत घेता येऊ शकतात त्यामुळे उद्योजकांनी क्लस्टर तयार करावेत.
आपण जर इतर राष्ट्रांमध्ये जर बघितलं तर अन्न व फळ प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याचे दिसून येईल. आपल्याकडे पोटॅटो चिप्स माहिती आहे, पण मशरूम चीपस, लेडी फिंगर चिप्स, पण बघायला मिळतील, मात्र त्याचे पॅकेजिंग खूप उत्कृष्ट व आकर्षक करावे लागते, जेणेकरून ते ग्राहकांना आकृष्ट करू शकते, थायलंडमध्ये अशा उदौगाला गाला खूप मोठ्या प्रमाणात सरकारचे सहकार्य लाभत असते, आपल्याकडे पण हे प्रमाण वाढत आहे हे विशेष, त्यासाठी उद्योजकांनी शक्यतो बाहेरच्या जगात काय चालले आहे हे बघण्यासाठी पाश्चात्य व इतर देशांमध्ये भेटीला गेले पाहिजे. अन्न व फळ प्रक्रिया साठी केंद्रशासनाने फूड पार्क उभे करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे यामध्ये 50 एकर पर्यंत तुमच्याकडे जागा असेल तर हे अनुदान मिळते राज्यसरकारने सुद्धा आता मिनी फूड पार्कसाठी अनुदान योजना सुरू केली आहे त्यामध्ये फक्त १० एकर जागा असली पाहिजे तर हे मिनी फूड पार्क सुरू होऊ शकते.
औरंगाबाद मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मका तयार होतो मात्र त्याचे प्रक्रिया न करता ते गुजरात मध्ये विकल्या जाते व तिथे मोठ्या प्रमाणात फार्म उद्योगासाठी त्याची प्रक्रिया केली जाते. आपल्याकडे सोया पीक मोठ्या प्रमाणात विदर्भात आढळून येते. त्याचे वेगवेगळे प्रकार पण बघायला मिळतात. सोया वाढीसाठी सुद्धा राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कर्ज योजना व अनुदान योजना तयार केलेल्या आहेत. त्यामधील महिला उद्योजकांसाठी विशेष योजना नुकतीच कार्यान्वित झाली आहे हे विशेष.
अन्न व फळ प्रक्रिया चा उद्योग करण्यासाठी तुम्हाला फुड कमिशनर ऑफिस मध्ये परवानगी घ्यावी लागते. मात्र शेती विषयक तुमचा उद्योग असेल तर त्याची सुरुवातीला गरज पडत नाही. मात्र बेकरी, आवळाचे पदार्थ फळावरील प्रक्रियासाठी तुम्हाला लायसन्सची गरज पडू शकते. कोकणामध्ये काजू मोठ्या प्रमाणात पिकतो, हापूस आंबा प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच्यावरती प्रक्रिया खूप कमी प्रमाणात होते व ती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. नागपूर व अकोलामध्ये आता अगरबत्तीचे क्लस्टर ऊभे राहत आहे. त्यांना सायकल ब्रांड तर्फे खूप मोठ्या ऑर्डर सुद्धा मिळाल्या आहेत. आधी अगरबत्ती चीनमधून येत होती. त्यावर केंद्र सरकारने आता कर लागू केल्यामुळे त्याच्या किंमती वाढल्या आहेत.
सगळ्याच उद्योजकांना मोठ्या प्रमाणात उद्योग अन्न व फळ प्रक्रियामध्ये करता येणार नाहीत. मात्र, त्यांनी मोठ्या उद्योगांना जर काही गोष्टी देऊ शकले तर हळूहळू त्यांचा पण उद्योग मोठा होत जाईल. उद्योग म्हणजे सगळ्यात महत्त्वाच तुम्हाला तुमचा माल विकता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सुरुवात लहान प्रमाणातच करावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध व साखर मोठ्या प्रमाणात तयार होते. विदर्भामध्ये त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे तिथे या उद्योगधंद्यांना मोठा वाव आहे. तेल उद्योग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्याबद्दल ही उद्योजकांनी जर विचार केला तर त्यामध्ये निर्यातीला पण मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते.
अन्न व फळ प्रक्रिया म्हटलं की आज-काल आपल्याकडे आणि विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये ऑरगॅनिक वस्तूंना प्राधान्य दिले जाते. भलेही त्याची किंमत जास्त असेल. त्यामुळे उद्योजकांनी ऑरगॅनिक अन्न ,फळ ,कपडे देण्यासाठी प्रयत्न करावा. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा उपलब्ध आहे. हळदी पावडर, हळदी पेस्ट हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागते . अशा ठिकाणी अशा बऱ्याच उद्योगाला वाव मिळू शकतो. कोकणामध्ये आता लाखेचे क्लस्टर तयार झाले आहे. त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत मागणी आहे. जंगलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उद्योग तेथील व्यक्तींना सुरू करता येऊ शकतात. उदाहरणार्थ, उपलब्ध कच्च्या मालापासून वनौषधी, मसाज तेल ,इत्यादी गोष्टी करून बाजारपेठेत आणता येतील. शेती उद्योगाला लागणाऱ्या वेगवेगळ्या मशिनरीजला सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्यासाठीसुद्धा राज्य शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, याचा लाभ उद्योजकांनी घेयला हवा.
बेकरी उद्योग सगळीकडे दिसून येतो मात्र तेथील स्वच्छता विचार करण्यासारखी असते. जर उद्योजकांनी एकत्र येऊन क्लस्टर तयार केले आणि त्याचा लाभ घेऊन सरकारतर्फे चांगल्या अद्यावत मशीन घेतल्या तर बेकरी उद्योग सुद्धा एक चांगल्यापैकी मोठ्या प्रमाणात सुरू करता येईल. नुकतीच दुबईमधून राज्यशासनाला अशी मागणी आली की, त्यांना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेती करून त्यातील उत्पादनावर प्रक्रिया करून तो माल दुबईला घेऊन जायचा. हा प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे नुकताच दिला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा उद्योग केला जाऊ शकतो याची आपण दखल घेतली पाहिजे. अन्न व फळ प्रक्रियाला नेहमीच मागणी असणार आहे व ती वाढत जाणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी नवीन तंत्रज्ञान हस्तगत करून राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन हा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे. त्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती सातत्याने घेतली पाहिजे.