लायन्स क्लब सदस्य संख्येत भारत अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:06 AM2021-01-08T04:06:06+5:302021-01-08T04:06:06+5:30
५ जानेवारी रोजी लायन्स क्लबची सदस्यसंख्या जाहीर करण्यात आली. क्लबचे आंतरराष्ट्रीय संचालक तथा क्लबच्या मेंबरशिप कमिटीचे चेअरमन डॉ. नवल ...
५ जानेवारी रोजी लायन्स क्लबची सदस्यसंख्या जाहीर करण्यात आली. क्लबचे आंतरराष्ट्रीय संचालक तथा क्लबच्या मेंबरशिप कमिटीचे चेअरमन डॉ. नवल मालू यांच्या कार्यकाळात भारताने हे यश मिळविले आहे. क्लबकडून करण्यात येणाऱ्या सेवाकार्यामध्ये तर भारत अव्वलस्थानी होताच, पण आता सदस्यसंख्येच्या बाबतीतही मोठे यश मिळाले आहे. भारतातील लायन्स क्लब सदस्यसंख्या २ लाख ८५ हजार तर अमेरिकेची २ लाख ७८ हजार आहे. यानंतर तिसऱ्या स्थानावर जपान आहे.
१९१७ साली शिकागो येथे लायन्स क्लबची स्थापना झाली. भारतामध्ये १९५६ साली लायन्स क्लब सुरू झाले. ३० वर्षांपूर्वी अमेरिकेत लायन्स क्लबची सदस्यसंख्या ७ लाख तर भारतात ५० हजार एवढी होती. आज याबाबतीत भारताने घेतलेली उत्तुंग झेप कौतुकास्पद ठरली. २ लाखांपेक्षाही अधिक लोकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, १०० पेक्षाही अधिक ब्लडबँक, नेत्र रुग्णालय असे अनेक सेवाभावी उपक्रम भारतात लायन्स क्लबतर्फे राबविण्यात येतात. हजारो सदस्य जोडल्यामुळे आता हे सेवाकार्य अधिकाधिक तळागाळापर्यंत पोहोचविण्यात यश येणार, असा विश्वास डॉ. नवल मालू यांनी व्यक्त केला.
माजी अध्यक्ष नरेश अग्रवाल, अशोक मेहता, सहअंतरराष्ट्रीय निर्देशक जे. पी. सिंग , व्ही. पी. नंदकुमार, एस. संपत यांच्यासह भारतातील सर्व काऊंसलिंग संचालक, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे, असे डॉ. मालू यांनी सांगितले.
चौकट :
६ महिन्यांत ५० हजार सदस्य
सदस्यसंख्या टिकवून ठेवण्याचे आव्हान तर समोर आहेच, पण त्यासोबतच ३ लाख सदस्यसंख्येचा टप्पा पूर्ण करायचा, हा मानस आहे. जून २०२० मध्ये माझा कार्यकाळ संपणार होता, पण कोरोनाच्या जागतिक संंकटामुळे तो १ वर्षासाठी वाढविण्यात आला. याकाळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहाेचण्याचा प्रयत्न केला. त्याचेच हे यश आहे. कोरोनामुळे आपल्या जीवाची काहीही शाश्वती देऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. असे असताना त्या ६ महिन्यांत ५० हजार सदस्य लायन्सच्या सेवाकार्यात आमच्यासोबत आले, ही खरोखरच आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
- डॉ. नवल मालू
आंतरराष्ट्रीय संचालक, लायन्स क्लब