सीमेपलीकडचा भारतीय कलाविष्कार; चीनच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादमध्ये सादर केले भरतनाट्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:53 PM2018-02-08T14:53:59+5:302018-02-08T14:55:50+5:30
वय, धर्म, जात, पंथ, लिंग, देश अशा कोणत्याही बंधनात कला बांधली जात नाही. कलाकाराने मनापासून उपासना केल्यावर कला आपसुकच येते, याचे उत्तम उदाहरण बुधवारी महागामी गुरुकुल येथे आयोजित नृत्यमैफलीत पाहायला मिळाले. या नृत्यमैफ लीत चिनी विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्याचा आविष्कार दाखवून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
औरंगाबाद : वय, धर्म, जात, पंथ, लिंग, देश अशा कोणत्याही बंधनात कला बांधली जात नाही. कलाकाराने मनापासून उपासना केल्यावर कला आपसुकच येते, याचे उत्तम उदाहरण बुधवारी महागामी गुरुकुल येथे आयोजित नृत्यमैफलीत पाहायला मिळाले. या नृत्यमैफ लीत चिनी विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्याचा आविष्कार दाखवून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
महागामी येथील खुल्या रंगमंचावर या नृत्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. आल्हाददायक वातावरणात रंगमंचावर होणारा चिनी विद्यार्थ्यांचा अप्रतिम पदन्यास प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण अनुभव देणारा ठरला. अवघ्या सहा वर्षांच्या चिनी चिमुकल्यांनी रंगमंचावर प्रवेश करताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यांनी पुष्पांजली व अलरिपू हे भरतनाट्यममधील नृत्यप्रकार लीलया सादर केला. यानंतर ८ ते १३ या वयोगटातल्या ६ विद्यार्थिनींनी भरतनाट्यमचे उत्तम दर्शन घडविले.
जीन शान शान ऊर्फ इशा यांचे बीजिंग येथे नृत्य प्रशिक्षण केंद्र असून त्यांच्यासोबतच या विद्यार्थिनी खास नृत्यातील गुरू- शिष्य परंपरा पाहण्यासाठी महागामी गुरुकुल येथे आल्या आहेत. यावेळी जीन शान शान यांनीही उपस्थितांशी संवाद साधून त्या या कलेकडे कशा वळल्या, हे सांगितले. महागामीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या दुर्गास्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर ओडिसी नृत्य प्रकारातील बटू नृत्यातून विद्यार्थिनींनी कोणार्क येथील सूर्य मंदिरातील मूर्तींची शृंखला नृत्याच्या माध्यमातून उलगडली. कथ्थक नृत्य प्रकारातील राग ‘गावती’ मधील दृत तीनतालात बांधल्या गेलेल्या सरगमचे सादरीकरण आणि जलबिंदू या प्रकारातून देण्यात आलेला पर्यावरणविषयक उपदेश उल्लेखनीय ठरला. पार्वती दत्ता यांनी जीन शान शान यांचा परिचय करून दिला तसेच नृत्य प्रकारांची माहिती दिली.