वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ भरीव कामगिरी करेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:23 AM2019-05-01T01:23:59+5:302019-05-01T01:24:24+5:30
इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. १ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले.
औरंगाबाद : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
१ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले. युजरवेंद्रसिंग यांनी भारताच्या चार कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्यांना फलंदाजीत प्रभाव टाकता आला नसला तरी त्यांनी बंगळुरूयेथे १९७७ साली इंग्लंडविरुद्धच्या क्षेत्ररक्षणात चमक दाखवताना पदार्पणातच विक्रमी ५ झेल घेत त्या वेळेस ठसा उमटवला. मूळ राजकोट येथील असणाºया यजुरवेंद्रसिंग यांनी ७८ कसोटी सामन्यांत ९ शतकांसह ३७६५ धावा केल्या आहेत. २१४ ही त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतीय संघाला या स्पर्धेत चांगली संधी आहे. पहिल्या चार संघांत ते असतील. तथापि, या स्पर्धेत चांगली चुरस पाहायला मिळेल. कारण अफगाणिस्तानसह सर्वच संघ तुल्यबळ आहे.’’ विराट कोहलीच्या नेतृत्व कौशल्याविषयी मात्र, त्यांनी वेगळे मत व्यक्त केले. ‘‘कर्णधार म्हणून विराट कोहली अद्याप परिपक्व झालेला नाही. तथापि, रवी शास्त्री आणि महेंद्रसिंग धोनी असल्यामुळे त्याला मदतच होईल. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, सूर्यकुमार यादव यांचाही विचार करायला हवा होता. ऋषभ पंतवरदेखील अन्याय झाला आहे. तो मर्यादित षटकांच्या स्पर्धेतील तज्ज्ञ खेळाडू आहे. अम्बाती रायुडूला फक्त एका मालिकेत अपयशी ठरल्याने वगळणे हेदेखील चूक आहे.’’ भारतीय अ संघाकडून प्रभावी कामगिरी करणाºया खेळाडूंनी संघात संधी न दिल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. युवा खेळाडूंना संधीच दिली नाही, तर त्यांच्यात प्रगती कशी होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील वनडे स्पेशालिस्ट अष्टपैलू खेळाडू आहे; परंतु त्याची महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी तुलना करणे योग्य ठरणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी शहीद भगतसिंह क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अॅड. उद्धव भवलकर, सचिव दामोदर मानकापे, विष्णू लोखंडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनंत नेरळकर यांनी केले.