इंडियाची प्रगती, भारत सुस्तावलेलाच
By Admin | Published: July 14, 2014 11:53 PM2014-07-14T23:53:27+5:302014-07-15T00:54:00+5:30
कळंब : स्वातंत्र्यानंतर जातीय व्यवस्था संपविण्याची आवश्यकता होती, पण ती आता अधिकच घट्ट होताना दिसत आहे. समाज जाती धर्माच्या भिंतीमध्ये अडकून पडल्याने समाजाची सर्वांगीण प्रगती होताना दिसून येत नाही.
कळंब : स्वातंत्र्यानंतर जातीय व्यवस्था संपविण्याची आवश्यकता होती, पण ती आता अधिकच घट्ट होताना दिसत आहे. समाज जाती धर्माच्या भिंतीमध्ये अडकून पडल्याने समाजाची सर्वांगीण प्रगती होताना दिसून येत नाही. आपल्या देशात दोन भारत देश राहतात त्यापैकी इंडिया वेगात प्रगती करीत असून, भारत मात्र सुस्तावलेला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले.
कळंब रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. शहरातील महावीर भवन येथे १३ जुलै रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रोटरीचे उपप्रांतपाल भुजंग शेट्टी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना फुटाणे म्हणाले की, घरातील टीव्ही नावाच्या वस्तूने सगळी कुटुंबव्यवस्थाच विस्कटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कुटुंबातील जबाबदार घटकांनी सकारात्मक नीतिमूल्ये जोपासण्याची आणि रुजविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी रामदास फुटाणे यांनी ‘चांगभलं.., भारत कधी-कधी माझा देश आहे.., कॉकटेल..’ प्रसिद्ध वात्रटिका सादर केल्या. या कार्यक्रमात रोटरीचे मावळते अध्यक्ष अॅड. दत्ता पवार यांनी नूतन अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, मावळते सचिव धर्मेंद्र शहा यांनी नूतन सचिव ब्रिजलाल भुतडा यांच्याकडे पदभार सोपविला. इनरव्हीलच्या मावळत्या अध्यक्षा मीनाक्षी भवर यांनी नूतन अध्यक्षा नीता देवडा तर मावळत्या सचिव राजश्री देशमुख यांनी नूतन सचिव निशा कळंबकर यांच्याकडे पदभार सोपविला. रामदास फुटाणे व भुजंग शेट्टी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, खेळाडू तसेच रोटरीच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदविलेल्या सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. अॅड. दत्ता पवार, डॉ. रामकृष्ण लोंढे, मिनाक्षी भवर, राजश्री देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. संजय घुले यांनी केले. ब्रिजलाल भुतडा यांनी आभार मानले. (वार्ताहर)
महापुरुषाची डिजीटलबाजी
सध्या गावोगाव महापुरुषांच्या वाढदिवसानिमित्त डिजीटल लावलेले दिसत आहेत. या महापुरुषाचे कार्य काय? ते डिजीटल का लावतात? त्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांना काय मिळते? ही बाब अद्याप आपल्या लक्षात आली नाही. डिजीटलच्या खालील बाजूला असलेल्या कार्यकर्त्यांची अवस्था पुढील दहा वर्षात काय होते? याची माहितीही हे महापुरुष घेतात का? अशी टिकाही रामदास फुटाणे यांनी यावेळी केली.