इंडिगोच्या मुंबई विमानाचे १२ जुलैपासून ‘टेकऑफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 06:45 PM2021-07-01T18:45:24+5:302021-07-01T18:45:54+5:30
इंडिगोचे मुंबई विमान आठवड्यातून सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी राहणार आहे
औरंगाबाद : औरंगाबादची हवाई सेवा पूर्वपदावर येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तात्पुरती बंद केलेली इंडिगोची मुंबई-औरंगाबाद आणि औरंगाबाद-मुंबई ही विमानसेवा १२ जुलैपासून पुन्हा एकदा सुरू होत आहे.
इंडिगोचे मुंबई विमान आठवड्यातून सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी राहणार आहे, अशी माहिती औरंगाबाद टुरिझम डेव्हल्पमेंट फाउंडेशन-सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष आणि उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रवासी संख्येत घट झाली. त्यामुळे इंडिगोने औरंगाबादहून सुरू असलेली सर्व विमाने तात्पुरती रद्द केली होती. काही दिवसांपूर्वीच इंडिगोने ५ जुलैपासून दिल्ली आणि हैदराबादचे विमान सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. दिल्लीची विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस, तर हैदराबादची विमानसेवा आठवड्यातून चार दिवस राहणार आहे. या दोन्ही विमानांपाठोपाठ मुंबईचे विमानही सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला. सध्या एअर इंडियाची विमान सेवा सुरू असून, त्याद्वारे शहराची मुंबई आणि दिल्लीला हवाई कनेक्टिव्हिटी आहे.