औरंगाबाद शहराला हवाय इंदौर पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:53 PM2018-03-10T23:53:39+5:302018-03-10T23:53:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत इंदौर शहराने अवघ्या काही महिन्यांमध्ये कठोर परिश्रम घेऊन अव्वल क्रमांक पटकावला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत इंदौर शहराने अवघ्या काही महिन्यांमध्ये कठोर परिश्रम घेऊन अव्वल क्रमांक पटकावला. इंदौर महापालिकेतर्फे प्रत्येक घरातून, दुकानातून दोन वेळा कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण करणे, ठिकठिकाणी प्रक्रियाही यशस्वीपणे करण्यात येते. याच इंदौर पॅटर्नची औरंगाबाद शहराला आज नितांत गरज आहे. जोपर्यंत महापालिका स्वत: या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करीत नाही, तोपर्यंत शहरातील कचºयाचा प्रश्न सुटणार नाही, हे निश्चित.
मध्यप्रदेशच्या इंदौर शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. येथील कचºयाचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे. डोअर टू डोअर कलेक्शन करताना ओला व सुका कचºयाचे शंभर टक्के वर्गीकरण करण्यात येते.
३५० रिक्षांवर सकाळी आणि सायंकाळी दोन वेगवेगळी गाणी वाजविण्यात येतात. हे गाणे ऐकून प्रत्येक घरातील महिला, आबालवृद्ध कचरा आणून टाकतात. जमा झालेला कचरा नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महापालिकेने उभारली आहे. प्रक्रिया केंद्रावर हा कचरा नेऊन शंभर टक्के प्रक्रियाही करण्यात येते. रस्त्यावर, चौकात, दुभाजकात कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंडही आकारण्यात येतो.
कचराकुंडी ही संकल्पनाच महापालिकेने ठेवलेली नाही. व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी दोन वेळा कचरा उचलण्यात येत असल्याने नागरिकही आनंदी आहेत. शहरात कुठेच घाण, कचरा दिसून येत नाही. मागील सहा महिन्यांपासून महापालिकेला कचरा प्रश्न भेडसावत आहे. आता हा प्रश्न गंभीर वळणावर येऊन ठेपला असून, २३ दिवसांपासून शहरात १० हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा पडून आहे.
शेकडो प्रयत्न केले तरी महापालिकेला कचरा उचलण्यात यश आलेले नाही. आणखी काही दिवसांमध्ये कचरा उचलण्याची कोणतीही शाश्वती नाही. चार दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी दोन दिवसांमध्ये संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा दावा सर्वसाधारण सभेत केला. हा दावा आतापर्यंतच्या अनेक दाव्यांप्रमाणे फोल ठरला.
जनजागृतीचा प्रचंड अभाव
वर्षानुवर्षे नागरिकांना पडलेल्या सवयीनुसार आजही विविध चौकांमध्ये गल्लीतील कोपºयावर, सोसायटीच्या बाहेर कचरा आणून टाकण्यात येतो. ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सवय असंख्य नागरिकांना नाही. नागरिकांमध्ये अगोदर जनजागृती करण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे.
शहरात साडेतीन लाख मालमत्ता
औरंगाबाद मनपा हद्दीत किमान साडेतीन ते चार लाख मालमत्ता असतील, असा अंदाज आहे. प्रत्येक घरातून कचरा उचलणे म्हणजे मनपासाठी इंद्रधनुष्य उचलण्यासारखाच प्रकार आहे. मनपाकडे सध्या तरी यासंदर्भात कोणतीच तयारी नाही. काही चांगले करण्याची इच्छाशक्तीही नाही.