कचऱ्याच्या नावावर इंदौर ‘टूर’; १३१ दिवस उलटले तरीही मनपाकडून ठोस उपाययोजना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 04:11 PM2018-06-27T16:11:35+5:302018-06-27T16:12:35+5:30
कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिका अधिकारी, पदाधिकारी ४ जुलै रोजी चकचकीत इंदौर शहराची पाहणी करणार आहेत. कचऱ्याच्या नावावर आता ही ‘टूर’ निघणार आहे.
औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला १३१ दिवस म्हणजेच चार महिने झाले तरी महापालिकेने ठोस अशा कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. आता कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिका अधिकारी, पदाधिकारी ४ जुलै रोजी चकचकीत इंदौर शहराची पाहणी करणार आहेत. कचऱ्याच्या नावावर आता ही ‘टूर’ निघणार आहे.
नारेगाव डेपोमध्ये कचरा टाकण्यासाठी मांडकी, गोपाळपूर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी विरोध केल्यापासून म्हणजे १६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी आहे. मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरून दंगलही झाली. अनेक नागरिक जखमी झाले. कचरा प्रश्नासंदर्भात नगरसेवकांनी घसा कोरडा होईपर्यंत ओरड केली. एक महापालिका आणि एक पोलीस आयुक्त यांची बदलीही झाली; मात्र कचराकोंडी फोडण्यात मनपा प्रशासनाला अद्याप यश मिळाले नाही. आता मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी इंदौर शहर पाहण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी चीनसह देशभरातील अनेक शहरांमधील घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली आहे; मात्र त्याचा महापालिकेला काहीही फायदा झालेला नाही.
इंदौरचे वैशिष्ट्य काय?
औरंगाबाद शहर आज जेवढे अस्वच्छ आहे; त्यापेक्षा कितीतरी अधिक इंदौर शहर अस्वच्छ होते. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत या शहराने गरुडझेप घेतली. अवघ्या एका वर्षात शहराचा कायापालट झाला. स्वच्छ भारत अभियानात मागील वर्षी आणि यंदाही देशात प्रथम येण्याचा मान या शहराने पटकावला. खाजगी अभिकर्त्यामार्फत सकाळ-संध्याकाळ प्रत्येक मालमत्ताधारकाकडून कचरा जमा करण्यात येतो. यासाठी काही ठराविक शुल्कही नागरिकांकडून घेण्यात येते. वॉर्डनिहाय जमा झालेला कचरा नेणे, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येते.