वाळूजच्या आॅटो क्लस्टरमध्ये औद्योगिक सुरक्षा कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:55 PM2018-02-17T23:55:23+5:302018-02-17T23:55:30+5:30
कामगारांच्या सुरक्षेची कारखानदारांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उद्योजकांनी कारखान्यात सुरक्षा आॅडिट करावे. अपघातानंतर कंपनी मालकांबरोबर आॅडिटरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा कामगारमंत्री संभाजीराव पा.निलंगेकर यांनी वाळूजच्या आॅटो क्लस्टरमध्ये आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी येथे दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : कामगारांच्या सुरक्षेची कारखानदारांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उद्योजकांनी कारखान्यात सुरक्षा आॅडिट करावे. अपघातानंतर कंपनी मालकांबरोबर आॅडिटरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा कामगारमंत्री संभाजीराव पा.निलंगेकर यांनी वाळूजच्या आॅटो क्लस्टरमध्ये आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी येथे दिला.
वाळूजच्या आॅटो क्लस्टर येथे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व परस्पर सहाय्य गटातर्फे (मार्ग) सुरक्षा अधिकारी कार्यशाळा व स्वयंसुरक्षेसाठी सुरक्षा साधनाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक सुधाकर राठोड, प्रधान सचिव राजेंद्र कुमार, कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम, अरुण विधेळ, मार्गचे अध्यक्ष जयेंद्र भिरूड, सचिव अमित दगडे, स्वप्नील देशमुख, सीएमआयचे प्रसाद कोकीळ, राम दहिफळ, प्रमोद सुरसे आदींची उपस्थिती होती. यावेळी निलंगेकर म्हणाले की, कुशल कामगारांमुळे राज्य गुंतवणुकीत देशात अग्रेसर आहे. परंतु कारखान्यांमधील अपघातांचे प्रमाण चिंतेचा विषय आहे. त्याविषयी उद्योजकांनी काळजी घ्यावी.
सुरक्षा साहित्याच्या प्रदर्शनात ४० कंपन्यांचा सहभाग
यानिमित्त भरविण्यात आलेल्या सुरक्षा साधने साहित्य या प्रदर्शनात सुरक्षा साधनाचे उत्पादन करणाºया ४० कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. सेफ्टी शूज, हॅण्डगोल्ज, सेफ्टी बेल्ट आदींसह विविध सुरक्षा साधने प्रदर्शनात त्यांनी मांडली होती. यावेळी निलंगेकर यांनी विविध स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. या प्रदर्शनात कंपनीत अपघात टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी, याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रदर्शनाला उद्योजकांनी गर्दी केली होती.
कामगार सुरक्षेसाठी नवीन पॉलिसी
कामगारांना आरोग्य व सुरक्षेचे कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नवीन पॉलिसी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीमुळे कंपनी कामगारांबरोबर त्यांच्या कुटुंबियांना मदत होणार असल्याचे कामगारमंत्री निलंगेकर यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रात कामगारांची चांगल्या प्रकारे सुरक्षा करणाºया उद्योगांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मंत्री निलंगेकर यांनी घोषित केले.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक सुधाकर राठोड यांनी कारखान्यांतील सुरक्षेविषयी सखोल मार्गदर्शन करून अपघात टाळण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे गरज व्यक्त केली. सध्या एक हजार कामगारांमध्ये केवळ एक सुरक्षा अधिकारी असल्याने कामगारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. नवीन कायद्यामध्ये २५० कामगारांमागे एक सुरक्षा अधिकाºयाची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली असून, अपघाताचे प्रमाण शून्य टक्के करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कामगार सुरक्षा प्रारूप आराखडा व संस्थेच्या संकेतस्थळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत शनिवारी चार सत्रांत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. उद्या रविवारी दिवसभर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून, त्यानंतर समारोप होईल.