जीएसटीमुळे बाजार व्यवस्थाच अडचणीत -उद्योजकांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:27 AM2017-08-13T00:27:08+5:302017-08-13T00:27:14+5:30
जीएसटीच्या अनेक जाचक अटी आणि नियोजनाच्या अभावामुळे बाजार व्यवस्थाच अडचणीत आल्याची तक्रार उद्योजक, व्यापाºयांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्र सरकारने देशभरात लागू केलेल्या वस्तू व सेवा (जीएसटी) करामुळे उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक अडचणी सापडले आहेत. जीएसटीच्या अनेक जाचक अटी आणि नियोजनाच्या अभावामुळे बाजार व्यवस्थाच अडचणीत आल्याची तक्रार उद्योजक, व्यापाºयांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याकडे केली. केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
औरंगाबादच्या दौºयावर आलेले गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी सायंकाळी उद्योगपती नंदकिशोर कागलीवाल यांच्या निवासस्थानी व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, उद्योगपतींशी जीएसटीसंदर्भात येणाºया अडचणी जाणून घेतल्या. यावेळी काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. अब्दुल सत्तार, सुभाष झांबड आदी उपस्थित होते. जीएसटीसंदर्भातील व्यापारी व उद्योजकांच्या अडचणी तसेच समस्या काँग्रेस पक्षातर्फे एखाद्या बड्या नेत्याने प्रथमच सहानुभूतीने ऐकून घेतल्या आहेत. उद्योगपती राम भोगले म्हणाले की, जीएसटीची रचना किचकट पद्धतीने केली आहे. प्रत्येक वेळी कराची रचना बदलताना अडचणी आल्या आहेत. केंद्रीय कर देताना अडचणी येत नव्हत्या. मात्र, आता आम्ही भरलेल्या जीएसटीची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारचे अधिकारी येतील. तेव्हा सर्वांनाच त्रास होणार आहे. राज्यातील अधिकाºयांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त आहे. त्याचा त्रास सर्वांनाच होणार असल्याची भीती भोगले यांनी व्यक्त केली. मानसिंग पवार म्हणाले की, जीएसटीमुळे आॅटोमोबाइल क्षेत्रातील गाड्यांच्या किमती कमी झाल्या. मात्र, राज्य सरकारने वाहनकर वाढवून ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण केली. जीएसटी घेतल्यानंतर वाहन कर कशासाठी हवा? असा सवाल करीत नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले व्यापारी जीएसटीमुळे संकटात सापडले असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.