उद्योग, आस्थापनांना ‘आरटीपीसीआर’साठी करावी लागणार व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:04 AM2021-03-09T04:04:26+5:302021-03-09T04:04:26+5:30
अंशत: लॉकडाऊन: दर १५ दिवसांनी चाचणी करून प्रमाणपत्र ठेवावे लागणार औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: ...
अंशत: लॉकडाऊन: दर १५ दिवसांनी चाचणी करून प्रमाणपत्र ठेवावे लागणार
औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन करण्यात येणार असून या काळात ज्या उद्योग, आस्थापनांना परवानगी दिलेली आहे, त्यांना कर्मचारी, कामगारांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते, जेथे खासगी, औद्योगिक आस्थापना आहेत, तेथील कर्मचारी, कामगारांचे आरटीपीसीआर टेस्टिंग त्या आस्थापनांना करावे लागेल.
या निर्णयामुळे उद्योजक आणि दुकानदार, व्यापारी आणि खासगी आस्थापनांना कुठलीही स्पष्टता नव्हती. दरम्यान महापालिका प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांना संपर्क केला असता त्यांनी कळविले की, उद्योग आस्थापनांना स्वत: आरटीपीसीआर चाचणी करण्याची व्यवस्था करावी लागेल. व्यापारी व दुकानातील कर्मचाऱ्यांना मनपाच्या टेस्ट सेंटरवर चाचणी करता येईल.
आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक
ज्या आस्थापनांना ११ मार्च ते ४ एप्रिल या अंशत: लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे, त्या आस्थापनांशी संबंधित सर्व मालक, चालक, कर्मचारी, मजूर व तेथील कार्यरत सर्व व्यक्तींना कोरोनोच्या पार्श्वभूमीवर दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी वारंवार करणे बंधनकारक राहणार आहे तसेच नजीकच्या काळातील तपासणी अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या आदेशात नमूद केले आहे.
व्यापाऱ्यांसाठी मनपाचे लसीकरण केंद्र उपलब्ध
उद्योग आस्थापनांना आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. मात्र, व्यापारी आणि दुकानदार, कर्मचाऱ्यांना मनपाच्या टेस्टिंग सेंटरवर आरटीपीसीआर करण्याची सुविधा मिळणे शक्य होणार आहे. शनिवार आणि रविवार १०० टक्के लॉकडाऊन असणार आहे. ११ मार्चपासून सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी असलेल्या आस्थापना सुरू राहणार आहेत.