सुट्या तेलाचे जुन्याच डब्यात पॅकिंगचा जुन्या मोंढ्यात ‘उद्योग’, मोठा साठा जप्त
By साहेबराव हिवराळे | Published: October 23, 2023 01:48 PM2023-10-23T13:48:10+5:302023-10-23T13:48:21+5:30
छत्रपती संभाजीनगरात एफडीएची सलग तिसरी कारवाई
छत्रपती संभाजीनगर : दोन दिवस मोठ्या प्रमाणावर बर्फी जप्त केल्यावर अन्न व औषध प्रशासनाने रविवारी तिसरी मोठी कारवाई जुन्या मोंढ्यात केली. सुटे खाद्यतेल जुन्याच डब्यात पॅकिंग केलेला साडेअठराशे किलोचा साठा छापा टाकून पथकाने जप्त केला.
एफडीएने सदर दुकानाला सील ठोकले असून, पुढील कारवाईपर्यंत ते बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जुन्या मोंढ्यात महेश संजय खोंडे यांच्या बालाजी ट्रेडिंगमध्ये खाद्यतेलाचे रिपॅकिंग करण्याचे काम सुरू होते. अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त अजित मैत्रे यांच्या उपस्थितीत अन्न निरीक्षक निखिल कुलकर्णी यांनी मिळालेल्या माहितीवरून धाड टाकली असता सुटे तेल वापरलेल्या जुन्या डब्यात टाकून त्यास लेबल चिकटविण्याचे काम सुरू होते. चौकशी केली असता कोणताही परवाना संबंधितांकडे नव्हता. तेल तपासणीचा अहवालदेखील नव्हता. सूर्यफूल १४९८.४ कि.ग्रॅ. आणि सोयाबीन तेल ३४३.४ कि.ग्रॅ. असा १,८४१ किलोंचा साठा (किंमत १७५,६८८ रु.) एफडीएने जप्त केला.
नमुने प्रयोगशाळेकडे...
दोन्ही तेलांत भेसळ आहे का, हे तपासण्यासाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. सदरील तपासणीचा अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये, हाच या कारवाईमागील हेतू आहे. जनतेनेही गुणवत्ता पाहूनच खरेदी करावी, असे एफडीएच्या पथकाने सांगितले.