उद्योगाच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’ला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:14 AM2018-07-19T01:14:34+5:302018-07-19T01:15:00+5:30
पर्यटन आणि उद्योगनगरी असलेल्या औरंगाबाद शहरात पाच महिन्यांपासून होत असलेल्या कचराकोंडीचा उद्योगनगरीच्या ‘ब्रँड व्हॅल्यूला फटका बसला आहे. येथील उद्योजकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पर्यटन आणि उद्योगनगरी असलेल्या औरंगाबाद शहरात पाच महिन्यांपासून होत असलेल्या कचराकोंडीचा उद्योगनगरीच्या ‘ब्रँड व्हॅल्यूला फटका बसला आहे. येथील उद्योजकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
मुंबई, पुणे आणि राज्यातील उद्योग जगतात कचऱ्याचे शहर म्हणून औरंगाबादची प्रतिमा तयार होत आहे. उद्योगासंदर्भातील कामकाजासाठी अन्य शहरात जाण्याची वेळ येते, तेव्हा शहरातील कच-याच्या प्रश्नाची विचारणा केली जाते. गुंतवणूक करताना दूरगामी विचार केला जातो. सध्या त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. कच-याचा प्रश्न अन्य शहरांतून येणा-या उद्योजकांना दिसणार नाही, यासाठी काळजी घ्यावी लागते. कच-यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अन्य शहरांतून नोकरीसाठी औरंगाबादेत येण्याचे टाळले जात आहे. या सगळ्यांचा उद्योगनगरीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. कचराकोंडी फुटण्याची गरज आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.