तब्बल अडीच वर्षांनंतर कळाले अपात्र उमेदवार
By Admin | Published: November 25, 2014 12:47 AM2014-11-25T00:47:17+5:302014-11-25T01:00:57+5:30
औरंगाबाद : सहायक कुलसचिवाच्या ४ जागांपैकी खुल्या प्रवर्गातून २ पुरुष व १ महिला, तर विमुक्त भटक्या जमातीच्या १ जागेसाठी अर्ज मागविण्यात आले होते
औरंगाबाद : सहायक कुलसचिवाच्या ४ जागांपैकी खुल्या प्रवर्गातून २ पुरुष व १ महिला, तर विमुक्त भटक्या जमातीच्या १ जागेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी खुल्या प्रवर्गातून ४९ व विमुक्त भटक्या प्रवर्गातून १५ उमेदवारांनी अर्ज केले होते.
या दोन्ही पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभवाची खातरजमा न करता विद्यापीठ प्रशासनाने या सर्व उमेदवारांची २० नोव्हेंबर २०१३ रोजी लेखी परीक्षा घेतली.
त्यानंतर २३ व २४ डिसेंबर २०१३ रोजी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा त्यातील काही उमेदवारांनी मुलाखत कार्यक्रमावरच आक्षेप घेतला. त्यामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी मुलाखतीचा कार्यक्रम स्थगित केला. त्यामुळे काही जणांनी न्यायालयात धाव घेतली.
महिनाभरापूर्वी न्यायालयाने निर्णय दिला की, एकतर ही जाहिरातच रद्द करावी किंवा दोन्ही पदांसाठी प्राप्त अर्जांची सक्षम छाननी समितीमार्फत पडताळणी करावी. जे पात्र उमेदवार असतील त्यांच्या मुलाखती घेतल्या जाव्यात. त्यानुसार विद्यमान कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या आदेशानुसार विद्यापीठ प्रशासन प्रमुख कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी आज २४ व उद्या २५ नोव्हेंबर रोजी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. साधना पांडे, डॉ. सतीश पाटील यांची एक सक्षम छाननी समिती स्थापन केली.
छाननी समितीने आज सकाळी ११ ते १२.३० वाजेपर्यंत उपकुलसचिव पदासाठी प्राप्त सर्व अर्जांची छाननी केली, तेव्हा या पदासाठी एकही पात्र उमेदवार नसल्याचा अभिप्राय कुलगुरूंना दिला.
दुसरीकडे मुलाखत समितीचे सचिव डॉ. धनराज माने, व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव, राज्यपालांचे प्रतिनिधी उल्हास उढाण, शासनाचे प्रतिनिधी डॉ. गुप्ता हे मुलाखतीसाठी विद्यापीठात उमेदवारांची प्रतीक्षा करीत बसले होते.
तेव्हा कुलगुरू डॉ. चोपडे यांनी उपकुलसचिव पदासाठी एकही पात्र उमेदवार नसल्याचे सांगून आजच्या मुलाखती रद्द केल्या. त्यामुळे मुलाखत समितीमधील सदस्यांना दुपारी १.३० वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले.