अपात्र शिक्षकांचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:17 AM2018-02-20T01:17:18+5:302018-02-20T01:17:24+5:30
खाजगी इंग्रजी शाळांमधून अकुशल शिक्षकांचा सुळसुळाट झाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. बी. एड., डी. एड. असे औपचारिक पद्धतीचे शिक्षण न घेतलेली ही बनावट शिक्षक मंडळी कमी पगारात काम करीत असल्यामुळे संस्थाचालकांचेही चांगलेच फावते आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोणत्याही क्षेत्रातील पदवी आणि उत्तम इंग्रजी येत असेल तर खाजगी इंग्रजी शाळांमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून सहज रुजू होऊ शकता. अशा प्रकारचा सध्याचा ‘ट्रेंड’ झाल्यामुळे खाजगी इंग्रजी शाळांमधून अकुशल शिक्षकांचा सुळसुळाट झाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. बी. एड., डी. एड. असे औपचारिक पद्धतीचे शिक्षण न घेतलेली ही बनावट शिक्षक मंडळी कमी पगारात काम करीत असल्यामुळे संस्थाचालकांचेही चांगलेच फावते आहे.
आजघडीला शहरातील खाजगी इंग्रजी शाळांची पाहणी केली असता, बहुसंख्य शाळांमध्ये सदर प्रकार दिसून आला. ही शिक्षक मंडळी अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम तर करतात, पण या शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या बाबतीत कोणताही अभ्यास नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यात हे शिक्षक निश्चितच कमी पडत आहेत. या गोष्टीचे दुष्परिणाम पुढील १० ते १५ वर्षांत दिसून येतील, असे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
याविषयी सांगताना बी. एड. महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद सांगतात की, बी. एड. किंवा डी. एड. अभ्यासक्रमात भावी शिक्षकांना अध्यापन पद्धती म्हणजेच एखादा विषय शिकविण्याचे कौशल्य ते मुलांचे मानसशास्त्र इथपर्यंत सगळेच शिकविले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मुद्दाच केंद्रस्थानी ठेवून या शाखांचा अभ्यासक्रम तयार केलेला असतो.
मुलांची मानसिकता कशी ओळखायची, मुलांना विषयात गुंतवून कसे ठेवायचे, एखाद्या कठीण प्रश्नाची उकल मुलांच्या मानसिकतेतून कशी करायची हे सगळे विषय बी. एड., डी. एड. अभ्यासक्रमातून शिकविले जातात.
बी. एड., डी. एड.दरम्यान पुस्तकी अभ्यासासोबतच भावी शिक्षकांना अनिवार्य असणारा छात्र सेवाकाळही पूर्ण करावा लागतो. यामध्ये शिकविण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो.
याशिवाय या अभ्यासक्रमांमध्ये मुलांचे सुप्तगुण ओळखून त्यांचा विकास करण्याचे प्रशिक्षणही मिळते. त्यामुळे असे कोणतेही प्रशिक्षण न घेता शिक्षक म्हणून रुजू झालेल्यांकडे देशाची भावी पिढी सोपवणे हे दुर्दैव असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.