कुख्यात हिमरत गँगचा म्होरक्या मुकुंदवाडीत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:39 PM2018-02-21T18:39:44+5:302018-02-21T18:41:39+5:30
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एका घरावर दरोडा टाकून ३० तोळ्यांचे दागिने आणि ३ लाखांची रोकड लुटल्यानंतर पसार झालेल्या हिमरत गँगच्या म्होरक्यास गुन्हे शाखा पोलिसांनी आज सकाळी मुकुंदवाडी परिसरात सापळा रचून अटक केली.
औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एका घरावर दरोडा टाकून ३० तोळ्यांचे दागिने आणि ३ लाखांची रोकड लुटल्यानंतर पसार झालेल्या हिमरत गँगच्या म्होरक्यास गुन्हे शाखा पोलिसांनी आज सकाळी मुकुंदवाडी परिसरात सापळा रचून अटक केली.
हिमरत मोहनसिंग चव्हाण (५६, रा.आसेगाव, ता. गंगापूर) असे अटकेतील दरोडेखोराचे नाव आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, सुशीलाबाई केवळ खैरनार (३५, रा. तेलदरा शिवार, सटाणा) या ३० आॅक्टोबर २०१७ रोजी सहकुटुंब घरात झोपलेल्या असताना रात्री ९ दरोडेखोरांच्या हिमरत गँगने दरोडा टाकला. दरवाजा तोडून दरोडेखोर घरात घुसले व कुटुंबियांना लोखंडी रॉडने मारहाण केली होती. ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख ३ लाख रुपये आणि एक मोबाईल असा सुमारे १२ लाख ८४ हजार रुपयांच्या ऐवजाची दरोडेखोरांनी लूट केली.
याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सटाणा पोलिसांनी तपास करून हिमरत गँगच्या चौघांना पकडले होते; मात्र टोळीचा प्रमुख हिमरत चव्हाण आणि अन्य चार दरोडेखोर पोलिसांना सापडत नव्हते. दरम्यान, हिमरत हा मुकुंदवाडी परिसरातील नातेवाईकाच्या घरी राहत असल्याची माहिती खबर्याने गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे, पोहेकॉ रामदास गायकवाड, संतोष गायकवाड, बापूराव बावस्कर, आनंद वाहूळ, विकास गायकवाड, रितेश जाधव आणि अनिल थोरे यांनी सोमवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरात सापळा रचला. हिमरत घरातून बाहेर येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. त्याच्याकडून दरोड्याचे आणखी गुन्हे उघडकीस येतील, अशी शक्यता सहायक आयुक्त थोरात यांनी व्यक्त केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.