पाच मुलींनंतरचे अर्भक ‘नकोशी’ समजून फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 12:39 AM2020-10-02T00:39:20+5:302020-10-02T00:39:47+5:30
बुधवारी सकाळी टुनकी शिवारात नवजात पुरुष जातीचे अर्भक सापडले. पोलिसांनी अर्भक घाटी रुग्णालयात तातडीने पाठवले.
सुनील शिरोडे ।
शिऊर (जि. औरंगाबाद) : पाच मुलींच्या पाठीवर पुन्हा सहावी मुलगीच झाल्याचा संशय आल्याने जन्मदात्या आईनेच चार तासांपूर्वी जन्मलेले अर्भक फेकले. मात्र, ते मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर येताच ‘ते’ आमचेच असल्याचा दावा या दाम्पत्याने केला. टुनकीत (ता. वैजापूर) या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अर्भकासह दावा करणाऱ्या माता, पित्यास औरंगाबादला डी.एन.ए. चाचणीसाठी पाठविले आहे. याप्रकरणी शिऊर पोलिसांत या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी सकाळी टुनकी शिवारात नवजात पुरुष जातीचे अर्भक सापडले. पोलिसांनी अर्भक घाटी रुग्णालयात तातडीने पाठवले. मात्र, हे सापडलेले अर्भक मुलगा असल्याची चर्चा गावभर कानोकानी झाली. त्यानंतर गावातील अशोक चंद्रभान साळुंके व त्यांची पत्नी सुनीता यांनी अर्भक आमचेच असून आपणच ते फेकून दिल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर साळुंके दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच सापडलेले अर्भक खरंच साळुंके कुटुंबियाचेच आहे का, याचा शोध घेण्यासाठी नवजात बाळ व साळुंके दाम्पत्याला औरंगाबादला घाटी रुग्णालयात डी.एन.ए. चाचणीसाठी पाठविण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले.