अंकुरलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:02 AM2021-07-01T04:02:02+5:302021-07-01T04:02:02+5:30
लोणी खुर्द : नुकत्याच अंकुरलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने लोणी खुर्द शिवारातील शेतकरी चिंतेत पडला आहे. ...
लोणी खुर्द : नुकत्याच अंकुरलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने लोणी खुर्द शिवारातील शेतकरी चिंतेत पडला आहे. त्यामुळे आधीच निसर्गाच्या लहरीपणापुढे हात टेकलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे कृषी विभागाकडून लोणी शिवारात पाहणी करण्यात आली असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
मागीलवर्षीप्रमाणे यंदाही मका उत्पादक शेतकऱ्यांवर पेरणीनंतर काही दिवसातच अरिष्ट निर्माण झाले. ज्याप्रमाणे मागच्यावर्षी मका, कपाशीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला, तशीच परिस्थिती यंदाही दिसून येत आहे. मका पिकावर पांढरा किडीच्या आकाराचा पट्टा दिसून येत आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. कर्ज काढून पेरणी केली. त्यात पावसाने वीस दिवसांपासून देखील दडी मारल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट आले. त्यात आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेल्या पेरण्यांतून अंकुरलेल्या मक्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे लोणी खुर्द शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून मार्गदर्शन करण्याची मागणी केली.
----
शेतकऱ्यांनी ही घ्यावी काळजी...
कृषी सहायक के. एन. भुजबळ, पी. टी. राजवळ व पुंड यांनी तातडीने लोणी खुर्द परिसरातील शेतांमध्ये भेटी दिल्या. जवळपास आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शिवारातील मक्याची पाहणी केली. यात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नेमक्या काय उपाययोजना कराव्यात, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
----
खरीप, रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर अशा प्रकारच्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. पिकांची रोज निरीक्षणे घ्यावीत. एकरी पाच पक्षीथांबे उभारावेत. पिकांवर पांढरा किडीच्या आकाराचा पट्टा दिसल्यास किंवा अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास अळीच्या अवस्थेनुसार औषधीची फवारणी करावी. औषधी फवारणी करताना सुरक्षा साधनांचा वापर करणे गरजेचे आहे, असे आवाहन कृषी सहायक के. एन. भुजबळ यांनी केले.
---
300621\img-20210622-wa0045.jpg
अंकुरलेल्या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव