ड्रॉप टाकल्यानंतर डोळ्यात जळजळ
By Admin | Published: March 17, 2016 12:13 AM2016-03-17T00:13:35+5:302016-03-17T00:15:58+5:30
परभणी : शहरातील खानापूर भागात महापालिकेच्या आरोग्य शिबिरात डोळ्यात ड्रॉप टाकल्याने ११ रुग्णांच्या डोळ्यांना जळजळ होत असल्याची तक्रार बुधवारी या रुग्णांनी केली़
परभणी : शहरातील खानापूर भागात महापालिकेच्या आरोग्य शिबिरात डोळ्यात ड्रॉप टाकल्याने ११ रुग्णांच्या डोळ्यांना जळजळ होत असल्याची तक्रार बुधवारी या रुग्णांनी केली़ दरम्यान, वापरलेला ड्रॉप निकृष्ट असल्याचा आरोप करीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन संताप व्यक्त केला़ या रुग्णांची जिल्हा नेत्र रुग्णालयात तपासणी करून औषधोपचार करण्यात आला आहे़
मनपाने ५ मार्च रोजी शहरातील विविध विभागात आरोग्य शिबिरे घेतली होती़ या शिबिराअंतर्गतच मनपाच्या खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही शिबीर झाले़ १८२ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली़ या रुग्णांना जेंटामायसीन हा ड्रॉप देण्यात आला़ खानापूर भागातीलच रुग्णांनी या ठिकाणी तपासणी केली होती़ यापैकी ११ रुग्णांना हा ड्रॉप डोळ्यात टाकल्यानंतर डोळ्यात जळजळ करणे, डोळा लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे आणि डोके दुखणे असा त्रास सुरू झाला़ सुरुवातीला रुग्णांनी हा त्रास बरा होईल, असा विचार करून उपचार केले नाहीत़ मात्र अशाच प्रकारचा त्रास इतरांनाही होत असल्याचे लक्षात आले़ त्यानंतर सुमनबाई चित्रे, अन्नपूर्णा रोकडे, इंदुबाई हनवते, शालूबाई मगरे, हरीबाई शिंदे, मंजुळाबाई मकरंद, यशोदाबाई पुंडगे, रानूबाई शेळके, गिरजाबाई लोकरे, शंकर जाधव, गोदावरी मुळे, सत्यभामा मिरगे, धु्रपदाबाई नरवाडे या रुग्णांसह नातेवाईक बुधवारी मनपा रुग्णालयात दाखल झाले़ त्यांनी या ठिकाणी संताप व्यक्त केला़ त्यानंतर या रुग्णांची जिल्हा नेत्र रुग्णालयात तपासणी करण्यात आली़ सायंकाळी ४ वाजता या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून त्यांच्यावर उपचार करण्यात आले़ या रुग्णांपैकी सत्यभामा मिरगे यांनी सांगितले, ड्रॉप टाकल्यानंतर डोळ्यात टोचल्यासारखे होत आहे़ डोळा लाल होत आहे़ परंतु, आता औषध टाकल्याने थोडे बरे वाटत आहे़ दरम्यान या भागातील युवक काँग्रेसचे परभणी शहर सचिव नंदकिशोर शिंदे यांनी रुग्णांना होत असलेला त्रास आणि पुढील धोका लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करीत सर्व रुग्णांना एकत्र करून दवाखान्यात आणले़ त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळू शकला़ एकाच वेळी ११ रुग्णांना त्रास झाल्याने वापरलेल्या आयड्रॉप विषयी संशय निर्माण होत असल्याचे शिंदे म्हणाले़