इंधन दरवाढीने औरंगाबादेत महागाईचा मार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:06 AM2018-05-23T00:06:28+5:302018-05-23T00:10:03+5:30
पेट्रोल-डिझेलमधील दरवाढ दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. परिणामी, मागील दीड महिन्यात मालवाहतुकीचे भाडे २० टक्क्यांनी वाढले. यामुळे धान्य, तांदूळ, डाळींचे भाव क्विंटलमागे ४० ते ६0 रुपयांनी वधारले आहेत.
प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पेट्रोल-डिझेलमधील दरवाढ दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. परिणामी, मागील दीड महिन्यात मालवाहतुकीचे भाडे २० टक्क्यांनी वाढले. यामुळे धान्य, तांदूळ, डाळींचे भाव क्विंटलमागे ४० ते ६0 रुपयांनी वधारले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूडआईलचे भाव वधारले आहेत. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. या दोन्हीचा परिणाम, देशात पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांकी उसळी मारली आहे. मागील ९ दिवसांत पेट्रोल लिटरमागे २ रुपये ५ पैसे, तर डिझेल २ रुपये ६ पैशाने महागले आहे. मंगळवारी २२ मे रोजी शहरात पेट्रोल ८५ रुपये ७१ पैसे, तर डिझेल ७३ रुपये ५१ पैसे प्रतिलिटर विकत होते. एक्स्ट्रॉ प्रीमियम पेट्रोल ८८ रुपये ४४ पैसे लिटर मिळत होते. याचा त्वरित परिणाम, मालवाहतुकीच्या भाड्यावर दिसून आला. ९ दिवसांत मालवाहतूक भाडे १० टक्क्यांनी महागले. त्यामुळे परराज्यातून येणारा गहू, तांदळाच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला. नवीन आर्थिक वर्ष सुरूहोण्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल ८२.६६ रुपये, तर डिझेल ६९.८७ रुपये प्रतिलिटर विक्री झाले होते. मात्र, कर्नाटक निवडणुकीमुळे भाव मध्यंतरी स्थिर होते. मागील दीड महिन्यात डिझेल ३.६४ रुपये, तर पेट्रोल ३.५ रुपये प्रतिलिटरने वाढले आहे.
मागील दीड महिन्याचा विचार केला, तर दोन टप्प्यांत मालवाहतूक भाडे २० टक्क्यांनी वाढले. यासंदर्भात धान्याचे होलसेल विक्रेता नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, दीड महिन्यापूर्वी हिमायतनगरहून (गुजरात) औरंगाबादेत गहू आणण्यासाठी १५५ ते १६० रुपये प्रतिक्विंटल मालट्रक भाडे लागत असे; पण आता १७० ते १७५ रुपये भाडे आकारले जात आहे. तसेच पूर्वी इंदौर (मध्य प्रदेश) हून गहू आणण्यासाठी ९० ते ९५ रुपये प्रतिक्विंटल मालट्रक भाडे लागे ते आता वाढून १०० ते १०५ रुपये झाले आहे. याचा परिणाम गव्हाच्या किमतीवर झाला असून मागील दीड महिन्यात क्विंटलमागे ४० ते ५0 रुपयांनी गव्हाचे भाव वाढले आहेत. तसेच तांदळाचे भावही वाढले आहेत. जालना, जळगाव येथून डाळी आणण्यासाठी ८ टक्के गाडीभाडे वाढले आहे. जर डिझेलच्या भावात आणखी वाढ झाली तर धान्य, डाळीच्या भावातही वाढ होईल.
राज्य सरकारने ठरविले, तर १० रुपयांनी कमी होतील दर
राज्य सरकार पेट्रोलवर २६ टक्के, तर डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारत आहे. भाजप सरकारने दुष्काळी कर, दारूबंदी कर, स्वच्छता कराच्या रूपात मागील तीन वर्षांत पेट्रोलच्या किमतीत ९ रुपये अधिकचा कर लावला. तत्पूर्वी आघाडी सरकारने लावलेला ५८ पैैसे शहर विकास सेस कायम आहे. असे मिळून पेट्रोलमध्ये प्रतिलिटरमागे ९ रुपये ५८ पैैसे शहरवासीयांना अधिभार द्यावा लागत आहे, तसेच डिझेलवर लिटरमागे २ रुपये ६८ पैैसे अधिभार द्यावा लागतो आहे. राज्य सरकारने ठरविले, तर व्हॅट अतिरिक्त कर रद्द करायचे तर पेट्रोलमध्ये सरळ १० रुपये कमी होतील. यामुळे महागाईत शहरवासीयांना थोडासा दिलासा मिळेल.
पाच वर्षांपूर्वी ८४ रुपये पेट्रोल, ७१ रुपये डिझेल विकले
पाच वर्षांपूर्वी १४ सप्टेंबर २०१३ रोजी पेट्रोल-डिझेल भावाचा भडका उडाला होता. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड आॅईलचे भाव प्रतिबॅरल १०० डॉलरपर्यंत पोहोचले होते. त्या दिवशी प्रतिलिटर ८३.८६ रुपये पेट्रोल, तर ७१.२० रुपये डिझेल विक्री झाले होते. तो भाववाढीचा उच्चांक ठरला होता. मात्र, आज मंगळवारी (२२ मे २०१८) पेट्रोल ८५.७१ रुपये, तर डिझेल ७३.५१ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. देशातील आजपर्यंतचा हा उच्चांक होय; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड आॅईलचे भाव सध्या प्रतिबॅरल ७२.४ डॉलर एवढे कमी आहेत.
-अखिल अब्बास, सचिव, पेट्रोल डीलर्स असोसिएशन
जून महिन्यात चक्का जाम
डिझेल दरवाढीचा फटका मालवाहतूकदारांना बसला आहे. मालवाहतुकीचे भाडे मागील दीड महिन्यात वाढले आहे; पण ६५ टक्के मालट्रक या औैद्योगिक वसाहतीत लागतात. यासाठी कंपन्यांशी करार केलेला असतो. त्या करारात डिझेल भाव वाढले तर १ ते २ रुपये भाडेवाढ करण्याचे नमूद असते. मागील दीड महिन्यात डिझेल प्रतिलिटर ३.६१ रुपये वधारले आहे. तेही कधी १५ पैैसे तर कधी ३५ पैैसे वाढ होत आहे. कंपन्या गाडीभाडे वाढून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे मालवाहतूकदारांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. ७० ते ८० टक्के मालट्रकवर बँकेचे कर्ज आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मालवाहतूकदार आर्थिक संकटात सापडतील. आॅल इंडिया मोटर काँग्रेस व सर्व मालवाहतूकदारांच्या संघटना जून महिन्यात निर्णायक चक्का जाम करणार आहेत. त्यासाठी कार्यक्रमाची आखणी केली जात आहे.
-फय्याज खान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना
लोडिंग रिक्षाचे भाडे स्थिर
जाधववाडी कृउबाच्या अडत बाजारपेठेतून शहागंज, औैरंगपुरा आदी भाजीमंडईत फळभाज्या, पालेभाज्यांची आवक होत असते. जाधववाडीतून औरंगपुरा भाजीमंडईत एका लोडिंग रिक्षातून १० ते १५ क्विंटलपर्यंत फळभाज्या, पालेभाज्या आणल्या जातात. लोडिंग रिक्षाचे भाडे ३०० रुपये द्यावे लागते. मागील दोन वर्षांपासून लोडिंग रिक्षाभाडे स्थिर आहे, तर शेअररिंग रिक्षातून १ ते दीड क्विंटल पालेभाज्या आणण्यासाठी १०० ते १५० रुपये भाडे आकारले जाते. पेट्रोल-डिझेलच्या भावाने उच्चांक गाठला तरी अजून रिक्षा व लोडिंग रिक्षाने भाडेवाढ केली नाही. यामुळे फळभाज्या, भाजीपालाच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला नाही.
-सागर पुंड, भाजी विक्रेता (औैरंगपुरा भाजीमंडई)
पेट्रोलकारची विक्री वाढली २५ टक्क्यांनी
पेट्रोल व डिझेलच्या दरामधील तफावत खूप कमी राहिली आहे. परिणामी, ग्राहक पेट्रोल कारला जास्त पसंत करीत आहेत. मागील वर्षभरात २० ते २५ टक्क्यांनी पेट्रोलकारची विक्री वाढली आहे. दुसरे कारण म्हणजे पेट्रोलपेक्षा डिझेलकारच्या किमती जास्त आहेत. तिसरे कारण ज्यांना घर ते कार्यालय व कार्यालय ते घर एवढीच कार चालवायची आहे. ते ग्राहक हमखास पेट्रोलकारच खरेदी करतात. डिझेल महागल्याने डिझेल इंजिनच्या कारची विक्री घटली आहे.
-राहुल पगारिया,
संचालक, पगारिया आॅटो