जायकवाडी धरणातून आतापर्यंत ७४ टीएमसी विसर्ग, तर १२५ टीएमसी झाली आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 08:10 PM2022-09-05T20:10:42+5:302022-09-05T20:12:17+5:30
सोडलेल्या पाण्यात जायकवाडी ऐवढे आणखी एक धरण ७५% भरले असते यावरून धरणातून किती पाणी सोडण्यात आले याचा अंदाज येऊ शकतो.
- संजय जाधव
पैठण (औरंगाबाद) : गेल्या ४१ दिवसापासून जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात येत असून आतापर्यंत ७४ टीएमसी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली. हंगामात सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात धरणातून एवढे पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून अद्यापही विसर्ग सुरू असल्याने यंदा धरणातून सर्वाधिक विसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जायकवाडी धरण कसे भरेल ? या चिंतेत मधल्या काही वर्षात मराठवाड्यातील जनतेला पोखरले होते. जायकवाडीच्या पाण्यासाठी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा संघर्षही पहावयास मिळाला . परंतु, गेल्या चार वर्षांपासून धरण काठोकाठ भरत असल्याने मराठवाड्यास दिलासा मिळाला आहे. यंदातर धरणात येणारी आवक व विसर्ग या आधीचे सर्वच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. १०२.७३ टीएमसी जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात यंदा १ जून पासून ३५५९.७४ दलघमी (१२५.७० टीएमसी) पाण्याची आवक झाली.
या पैकी २०८६.३२ दलघमी (७४ टीएमसी ) पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. सोडलेल्या पाण्यात जायकवाडी ऐवढे आणखी एक धरण ७५% भरले असते यावरून धरणातून किती पाणी सोडण्यात आले याचा अंदाज येऊ शकतो.
दरम्यान धरणातून सांडव्याद्वारे ( गेट) ६७.१२ टीएमसी, जलविद्युत केंद्रातून ३.४६टीएमसी, उजव्या कालव्यातून २.६२ टीएमसी व डाव्या कालव्यातून ०.४७ टीएमसी असा एकूण ७४ टीएमसी विसर्ग करण्यात आल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण व विजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान २०२१ मध्ये ४९ टीएमसी, २०२० मध्ये ८१ टीएमसी, २०१९ मध्ये ९५ टीएमसी व २०१७ मध्ये ९.८८ टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. सोमवारी धरणाचे १८ दरवाजे १ फुटाने वर उचलून २०३६४ क्युसेक्स विसर्ग सुरू असून धरणात ९७.४७% जलसाठा झालेला आहे.