राख्यांवर शिवलिंग, त्रिशूल, डमरू; यंदाच्या रक्षाबंधनावर महाशिवपुराणचा प्रभाव
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 28, 2023 12:02 PM2023-08-28T12:02:04+5:302023-08-28T12:03:02+5:30
बाजारात दोन हजारपेक्षा अधिक डिझाइनच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : पं. प्रदीप मिश्रा यांनी ‘महाशिवपुराण’ची महती घराघरात पोहोचविली आहे. यामुळे मागील तीन ते चार वर्षांत महादेवाची भक्ती करणाऱ्यांची संख्या लाखोंने वाढली आहे. याची प्रचिती शहरातील ११७ शिव मंदिरांतील गर्दीने लक्षात येते. त्यात आता नीज श्रावण महिना सुरू आहे अन् राखीपौर्णिमा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या भाऊरायासाठी बहिणीही भगवान शंकर, शिवलिंग, रुद्राक्ष असेलल्या राख्यांना पसंती देत आहेत, हे बाजारात फेरफटका मारल्यावर दिसून येते.
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला आणखी दृढ करणारा सण ‘राखीपौर्णिमा’. भावाच्या मनगटावर स्नेहाचा धागा बांधून बहीण रक्षणाची हमी घेते. यानिमित्त बाजारात दोन हजारपेक्षा अधिक डिझाइनच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. त्यात यंदा शिवलिंग, महाकाल, त्रिशूल, डमरूचे पेंडल असलेल्या राख्यांना बहिणी आवर्जून खरेदी करत आहेत. याशिवाय बालगणेश, बाळकृष्ण, राधा-कृष्ण या राख्यांनाही पसंती दिली जात आहे.
रविवारी सायंकाळी राख्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. तासनतास दुकानात थांबून आपल्या लाडक्या भाऊरायासाठी युनिक राखी खरेदी केली जात होती.
डायमंड, चांदीच्या राख्या
बाजारात डायमंड, चांदीच्या राख्याही विक्रीला आल्या आहेत. चांदीच्या राख्या राजकोटहून आणण्यात आल्या आहेत. त्यांची ८० ते १५० रुपये दरम्यान विक्री होत आहे. तसेच चांदी, डायमंड असलेल्या राख्या ६०० ती १२०० रुपये दरम्यान मिळत आहेत. ९२.५ प्रीमियम सिल्व्हर रेंज म्हणून या राख्यांना ओळखले जात आहे.
देव राख्या झाल्या डिझायनर
देव राखी म्हटली की केशरी, पिवळा, गुलाबी रेशीम, लोकरचा धागा. देवघरातील देवांना या राख्या आवर्जून बांधल्या जातात. तसेच वाहन, तिजोरीलाही याच राख्या बांधतात. आता या राख्यांवर चमकती टिकली, मोती, डिझाइन वर्क लावून आकर्षक बनविण्यात आल्या आहेत.