ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या रिक्त पदांची माहिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:25+5:302021-09-03T04:04:25+5:30
औरंगाबाद : राज्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टरांची किती पदे रिक्त आहेत, ती पदे केव्हा भरणार, याची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत ...
औरंगाबाद : राज्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टरांची किती पदे रिक्त आहेत, ती पदे केव्हा भरणार, याची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. एम.जी. मेहरे यांनी गुरुवारी राज्य शासनाला दिले. सरकारी वकील अजित कार्लेकर यांनी बाजू मांडली.
खंडपीठाने राज्याच्या ग्रामविकास विभागाला प्रतिवादी करण्याची मुभा याचिकाकर्ता खासदार इम्तियाज जलील यांना देऊन ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले.
ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त
राज्यातील बहुतांश ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत, असे निवेदन करून खा. जलील यांनी एक तक्ता सादर करून औरंगाबादलगतच्या १२ तालुक्यांमधील डॉक्टरांच्या रिक्त पदांची माहिती खंडपीठाला दिली. त्यानुसार वैजापूर- १६, सिल्लोड- १२, गंगापूर- १७, कन्नड- ८, पाचोड- ९, खुलताबाद- ४, सोयगाव- ६, पिशोर- ४, फुलंब्री- ५, करमाड- ४, अजिंठा- ३, बिडकीन- ४, देवगाव रंगारी- ४ आणि औरंगाबाद मुख्यालयात ९ अशा १२ तालुका रुग्णालयांत एकूण १०५ डॉक्टर कार्यरत आहेत.
त्यात २८ स्त्रीरोगतज्ज्ञ, १२ बालरोगतज्ज्ञ, ७ भूलतज्ज्ञ, केवळ गंगापूरला एक फिजिशियन, सिल्लोड आणि गंगापूरला प्रत्येकी एक शल्यचिकित्सक, ६ अस्थिरोगतज्ज्ञ, केवळ वैजापूरलाच एक नेत्रतज्ज्ञ केवळ सिल्लोडला एक वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) आणि वरील १२ रुग्णालयांत एकूण ३९ एमबीबीएस डॉक्टर, ७ वैद्यक (पीएसएम) आणि केवळ सोयगावला एक बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहे.
चौकट........................
तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे घाटीत गर्दी
ग्रामीण रुग्णालयांत पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटीत) रुग्णांची प्रचंड गर्दी असते. ग्रामीण रुग्णालयांत इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. ती भरण्याची जबाबदारी ग्रामविकास विभागाची आहे. त्या विभागाला प्रतिवादी करण्याची मुभा देण्याची विनंती खा. जलील यांनी केली आहे.