बसफेऱ्यांची माहिती आमदारांना!
By Admin | Published: July 21, 2016 12:42 AM2016-07-21T00:42:45+5:302016-07-21T01:06:09+5:30
जालना : आपल्या मतदार संघात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या किती फेऱ्या आहेत, याची माहिती आता आमदारांना दिली जाणार आहे.
जालना : आपल्या मतदार संघात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या किती फेऱ्या आहेत, याची माहिती आता आमदारांना दिली जाणार आहे. सार्वजनिक उपक्रम समितीच्या सूचनेनुसार मध्यवर्ती कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. ही माहिती अ, ब आणि क असे वर्गीकरण करून दिली जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाला सूचना देण्यासाठी २०१५-१६ साठी राज्य स्तरावर सार्वजनिक उपक्रम समिती स्थापन करण्यात आलेली आहे. विधानसभा सदस्य डॉ. सुनील देशमुख हे या समितीचे प्रमुख असून सदस्य म्हणून विविध मतदार संघातील २५ सदस्यांचा समावेश आहे. या समितीच्या म्हणण्यानुसार मध्यवर्ती कार्यालयाने प्रत्येक विभागाला बसफेऱ्यांची माहिती काढण्यास सांगितले आहे. ही माहिती आपल्या विभागातील सर्व आमदारांना द्यावी, असे परिपत्रक १५ जुलै रोजी कार्याललयाला प्राप्त झाले असून त्यानुसार एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ पर्यंतची माहिती काढण्यात आल्याचे वाहतूक निरीक्षक आशोक आघाव यांनी सांगितले.
अनेकवेळा आमदार हे नागरिकांच्या मागणीनुसार बसफेऱ्या वाढविण्यास सांगतात. परंतु बसफेऱ्या सुरू केल्यानंतर त्यातून महामंडळाला तोटा होईल की, फायदा हे त्यांना माहिती नसते.
तसेच या भागातून किती प्रवासी बसने प्रवास करतात, याची माहिती नसते. हे समजण्यासाठी महामंडळाने अ, ब आणि क असे वर्गीकरण करून बसफेऱ्यांची माहिती दिली
आहे. उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न आणणाऱ्या बसफेऱ्या ‘अ’ गटात घेतल्या असून न परवडनाऱ्या परंतु प्रवाशांसाठी सुरू असलेल्या बसफेऱ्या ‘क’ मध्ये घेण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
४बसेस सुरू करा, बसफेऱ्या वाढवा अशा मागण्या घेऊन कार्यकर्ते व नागरिक हे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांकडे जातात. त्यानंतर आमदार रापमला सूचना देतात. परंतु सदरील मार्गावर बसफेरी सुरू केल्यावर त्या पासून तोटा होण्याची शक्यता असते, म्हणून अधिकारी तसदी घेत नाहीत. यावरून मग वाद निर्माण होतात. परंतु आता ही माहिती आमदारांना दिल्याने या वादाला काहीप्रमाणात आळा बसल्याशिवाय राहणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
वर्षभरात १५ हजार बसफेऱ्या
४एका वर्षात जालना विभागातील चार आगारांमधून १५ हजार ३७७ बसफेऱ्या धावल्या आहेत. अ मध्ये ४ हजार ५१२, ब मध्ये ८ हजार ४८९ तर क मध्ये २ हजार ३७६ बसफेऱ्या असल्याचे सूत्रांनी
सांगितले.