गुन्ह्यांच्या तपासाची माहिती आता आॅनलाईन
By Admin | Published: February 22, 2016 12:17 AM2016-02-22T00:17:57+5:302016-02-22T00:17:57+5:30
शिरीष शिंदे , बीड १ जानेवारीपासून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामधील डायरी पद्धत बंद करण्यात आली असून, केवळ आॅनलाईन पद्धतीने गुन्ह्याची नोंद केली जात आहे
शिरीष शिंदे , बीड
१ जानेवारीपासून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामधील डायरी पद्धत बंद करण्यात आली असून, केवळ आॅनलाईन पद्धतीने गुन्ह्याची नोंद केली जात आहे. आता यापुढे जात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आॅन लाईन पद्धतीनेच वेळोवेळी अपलोड करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी ठाणे प्रमुखांना दिल्या आहेत.
‘क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम’ (सीसीटीएनएस) या यंत्रणेद्वारे सर्व ठाणी जोडली गेली आहेत. हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या दोन वर्षांपासून आॅन लाईन एफआयआरसह इतर बाबींची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील ठाणेप्रमुख व पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असल्याचे अधीक्षक कार्यालयातील जिल्हा संगणक प्रशिक्षण केंद्राचे फौजदार शेख अकबर यांनी सांगितले.
दरम्यान, १ जानेवारी २०१६ पासून आॅनलाईन पद्धतीने एफआयआर नोंदणीची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पारंपरिक डायरी तडीपार करण्यात आली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर या एफआयआरची प्रत प्रिंट स्वरूपात देण्यात येईल. मात्र त्यावर ठाणे प्रमुखांची डिजिटल स्वाक्षरी अद्याप नाही, ती लवकरच उपलब्ध होईल. दैनंदिन घडणारे गुन्हे, अदखलपात्र गुन्हे, आकस्मिक मृत्यू, हरवलेल्या व्यक्ती यांची माहिती आॅन लाईन पद्धतीने नोंद केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ठाण्यांमध्ये सदरील नोंदणी झालेली माहिती एका क्लिकवर त्या त्या ठाण्याच्या प्रमुखांना व अधिकाऱ्यांना पाहता येऊ शकते.
एका क्लिकवर आरोपीची कुंडली
सीसीटीएनएस अंतर्गत जिल्ह्यातील २७ ठाण्यांतील डायरी बंद करण्यात आली असून, आॅन लाईन पद्धतीने एफआयआर नोंदविले जात आहेत. सर्व ठाणे १०० टक्के ‘पेपरलेस’ झाले आहेत. आॅन लाईन पद्धतीने एफआयआर दाखल करण्यासह घटनास्थळाचा पंचनामा, अटक, तपास व चार्जशीट असे पाच प्रकारचे फॉर्म आहेत. तपास आॅन लाईन पद्धतीने अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोपीचे नाव टाकले तर त्याच्यावरील गुन्ह्यांचा सर्व तपशील समोर येईल. यामुळे रेकॉर्डवरील आरोपी शोधण्यास फारसा वेळ लागणार नाही.