इन्फ्रास्ट्रक्चर तयार, पण रस्ते नाहीत; बिडकीन डीएमआयसीत उद्योग येईनात, प्रगती ठप्प
By बापू सोळुंके | Published: December 11, 2023 06:21 PM2023-12-11T18:21:50+5:302023-12-11T18:22:23+5:30
ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील ९० टक्के भूखंड विक्री झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : येथे जास्तीत जास्त मोठे उद्योग यावेत, यासाठी स्थापन झालेल्या ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे; मात्र चांगली कनेक्टिव्हिटी (रस्ते) नसल्याने मोठ्या गुंतवणूकदार उद्योगांनी बिडकीन डीएमआयसीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला आणि शेंद्रा-बिडकीन रस्त्याच्या कामाला तातडीने चालना दिली तरच बिडकीन डीएमआयसीचा विकास शक्य असल्याचे सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील ९० टक्के भूखंड विक्री झाले आहेत. यामुळे गतवर्षीपासून ऑरिक प्रशासनाने बिडकीन डीएमआयसीत जास्तीत जास्त गुंतवणूकदार यावेत, यासाठी बिडकीन औद्योगिक पट्ट्यात ८ हजार एकर जमीन १५ वर्षापूर्वी संपादित करण्यात आली होती. यानंतर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या. परंतु, मागील सहा वर्षांत एकही मोठा प्रकल्प येथे आला नाही. मोठ्या उद्योगांना रस्ते, रेल्वे अथवा हवाई अशा कनेक्टिव्हिटीची गरज असते. असे असताना छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाची घोषणा करण्यात आली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी कधी होईल, हे सांगता येत नाही. परिणामी, उच्च दर्जाचे औद्योगिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार असूनही मोठ्या गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली.
तीन कंपन्यांकडून कामाला सुरुवात
ऑरिक प्रशासन आणि सीएमआयएच्या प्रयत्नानंतर गतवर्षी बिडकीनमध्ये कॉस्मो फिल्म, पिरॅमल फार्मा आणि टेक्नोक्रॉप्ट या तीन कंपन्यांनी भूखंड घेऊन बांधकामही सुरू केले. येत्या काही महिन्यांत उत्पादनाला सुरुवात होईल.
शेंद्र्यातील ९० टक्के भूखंड वाटप
ऑरिकने पहिल्या टप्प्यात शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील २ हजार १०८ एकर जमीन विकसित केली. या जमिनीवर १७५ औद्योगिक भूखंड विकसित करण्यात आले होते. समृद्धी महामार्ग, जालना रोड आणि धुळे सोलापूर महामार्ग कनेक्टिव्हिटीमुळे सहा वर्षांत येथील ९० टक्के भूखंड वाटप झाले आहेत.
फूड पार्कचे काम अंतिम टप्प्यात
डीएमआयसीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात १६८ एकरवर फूड पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी मूलभूत सोयीसुविधांचे काम अंतिम टप्प्यात आहे. यानंतर संबंधित उद्योग येतील, अशी आशा ऑरिक प्रशासनास आहे.
रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे
रोड कनेक्टिव्हिटी हा प्रमुख अडसर आहे. शेंद्रा ते बिडकीन डीएमआयसी रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, तसेच प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाचे काम हाती घ्यावे, यासाठी सीएमआयएच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली. त्यांनीही ही कामे करण्याचे आश्वासन दिले आहे.
- दुष्यंत पाटील, अध्यक्ष, सीएमआयए.