अमानुष! श्वान टपावर बसू नये म्हणून कार कव्हरला चक्क खिळे, प्राणीप्रेमींमधून संताप

By संतोष हिरेमठ | Published: June 14, 2024 01:24 PM2024-06-14T13:24:15+5:302024-06-14T13:24:36+5:30

खिळे असलेल्या कव्हरची ऑनलाइन विक्री अन् वापरही जोरात; मोकाट कुत्री जखमी होण्याचा धोका

Inhuman! Car covers nailed to prevent dogs from sitting on top, outrage from animal lovers | अमानुष! श्वान टपावर बसू नये म्हणून कार कव्हरला चक्क खिळे, प्राणीप्रेमींमधून संताप

अमानुष! श्वान टपावर बसू नये म्हणून कार कव्हरला चक्क खिळे, प्राणीप्रेमींमधून संताप

छत्रपती संभाजीनगर : रात्री रस्त्यावर उभ्या चारचाकीच्या टपावर श्वान चढून बसतात. श्वानाला काही तरी टोचते अन् क्षणात कारवरून ते उडी मारते. मोकाट श्वानांना चारचाकीपासून दूर ठेवण्यासाठी चक्क खिळे असलेले कव्हर वापरले जात आहे. या कव्हरची ऑनलाइन विक्री जोरात सुरू आहेच. मात्र, वाहनचालकांकडून त्याचा वापरही होत आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर रात्री चारचाकी उभ्या असतात. या चारचाकीच्या टपावर मोकाट कुत्रे चढतात. यातून अनेकदा चारचाकीचे छत दाबते, स्क्रॅचेसही पडतात. चारचाकीची काचही फुटण्याचा धोकाही असतो. शिवाय अस्वच्छतेचाही प्रश्न असतो. या सगळ्यावर उपाय म्हणून खिळेयुक्त कव्हर बाजारात आले आहे. चारचाकीच्या छतावर आणि समोरील बाजूवर हे कव्हर टाकता येते. मात्र, यातून श्वान जखमी होऊ शकते.

वाहनाचे नुकसान टाळण्यासाठी हा उपाय नाही
वाहनाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. मात्र, अशा प्रकारचे कव्हर वापरणे, हा त्यावर पर्याय नसल्याचे प्राणीप्रेमी संघटनांनी म्हटले. टोकदार खिळे कव्हर टाकल्यानंतर मोकाट श्वान अशा चारचाकीपासून दूर राहतात; परंतु अशा कव्हर असलेल्या चारचाकीवर पहिल्यांदा जाणारे श्वान जखमी होण्याचा धोका आहे.

कव्हरविरुद्ध प्राणीप्रेमींनी एकत्र यावे
चारचाकीपेक्षा एखाद्याचा जीव महत्त्वाचा आहे, हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. चारचाकीवर स्क्रॅचेस पडतात, म्हणून अशा टोकदार खिळे असणाऱ्या कव्हरला प्रमोट करता कामा नये. चारचाकीवर साधे कव्हरही वापरता येतील. प्राण्यांना इजा पोहोचवणाऱ्या अशा कव्हरविरुद्ध प्राणीप्रेमींनी एकत्र आले पाहिजे. घरे बांधल्या गेल्याने श्वानांचा निवारा हिरावला गेला आहे. नागरिकांनी स्वत: घरापुढे अथवा काॅलनीत त्यांच्यासाठी छोटेसे शेल्टर करावे.
- अमृता दौलताबादकर, सचिव, पीपल फाॅर ॲनिमल

असे कव्हर वापरणे चुकीचे
चारचाकीसाठी टोकदार खिळे असलेले कव्हर वापरणे चुकीचे आहे. श्वानांना त्यापासून इजा होऊ शकते. नागरिकांनी असे कव्हर वापरणे टाळावे. शिवाय अशा कव्हरवर बंदी आली पाहिजे.
- प्रवीण ओहळ, सचिव, होप अँड ॲनिमल ट्रस्ट

Web Title: Inhuman! Car covers nailed to prevent dogs from sitting on top, outrage from animal lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.