संघाच्या प्रांत कार्यालयावर ‘शाई फेक’
By Admin | Published: July 10, 2017 12:42 AM2017-07-10T00:42:27+5:302017-07-10T00:47:59+5:30
औरंगाबाद : भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारिप- बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविल्याच्या घटनेचे पडसाद औरंगाबादेत उमटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारिप- बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविल्याच्या घटनेचे पडसाद औरंगाबादेत उमटले. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताच्या कार्यालयावर शाई व पत्रके फेकली. यावेळी भाजप आणि संघाच्या निषेधाच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या मध्यप्रदेशातील महू येथे शनिवारी जनवेदना किसान संमेलनात अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होण्यासाठी गेले होते. संमेलनानंतर तेथील विज्ञान विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे अनावरण प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम आटोपून अॅड. आंबेडकर हे विद्यापीठाच्या बाहेर पडत होते. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविले. अॅड. आंबेडकर यांची गाडी फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. या घटनेचा निषेध करण्यासाठी औरंगाबादेत बहुजन क्रांती मोर्चाचे संतप्त कार्यकर्ते रविवारी दुपारी अडीच वाजता भाग्यनगरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत कार्यालयावर गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप, संघाच्या निषेधाच्या घोषणा देत संघ कार्यालयाच्या पाटी, दरवाजावर शाई फेकली व निषेध नोंदवला. प्रकाश आंबेडकरांच्या केसालाही धक्का लागला, तर आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देणारी पत्रकेही तेथे भिरकावली.
जोरदार घोषणाबाजी
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीनेच संघ कार्यालयात प्रवेश केला. काही कार्यकर्त्यांनी शाईफेक केली, तर काहींनी संघ, भाजपविरोधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला व तेथून काढता पाय घेतला.
या कार्यकर्त्यांचा समावेश
संघाच्या प्रांत कार्यालयावरील शाईफेक आंदोलनात सचिन शिंदे, कमलेश चांदणे, संदीप पट्टेकर, आनंद लोखंडे, बलवान शिंदे, संघर्ष सोनवणे, राजेश राठोड, सुरेश त्रिभुवन, प्रदीप गणकवार, सुदेश पवार, पवन पवार, विजय डोळस, रवी देहाडे आदींचा समावेश होता.
तक्रारीचा निर्णय बैठकीनंतर
या प्रकारानंतर सायंकाळी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घ्यायचा का नाही, ते ठरेल, अशी माहिती देवगिरी प्रांत कार्यालयाचे प्रमुख प्रशांत लिंगायत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पोलिसांचा गराडा
संघाच्या देवगिरी प्रांत कार्यालयावर शाईफेक झाल्याचा प्रकार कळताच क्रांतीचौक पोलिसांनी कार्यालयाकडे धाव घेतली. या आंदोलनानंतर कार्यालयाजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला.