नावीन्यपूर्ण! होतकरू विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झेडपीच्या ५२ अभ्यासिका
By विजय सरवदे | Published: April 11, 2024 06:51 PM2024-04-11T18:51:37+5:302024-04-11T18:52:11+5:30
जून अखेरपर्यंत कामे आटोपण्याचे ग्रामसेवकांना आदेश
छत्रपती संभाजीनगर : नवीन शैक्षणिक वर्षात मुलांसाठी आधुनिक अभ्यासिकांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता येईल, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात नावीन्यपूर्ण अभ्यासिकेचे कामकाज जून अखेरपर्यंत पूर्ण करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास विना यांनी ग्रामसेवकांना दिले.
जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सन २०२२- २३ आणि सन २०२३-२४ या दोन वर्षांत ५२ आधुनिक अभ्यासिका उभारण्यासाठी निधी मंजूर केला होता. गुरुवारी अभ्यासिकांचे बांधकाम, फर्निचर, लाइट फिटिंग, बैठक व्यवस्था, सोलर लाइट व अंतर्गत लहान-मोठ्या कामांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी घेतला. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२२-२३ मध्ये १९, तर सन २०२३-२४ मध्ये ३३ ग्रामपंचायतींना विशेष अनुदान मंजूर केले होते. त्यानुसार अभ्यासिकांचे बांधकाम व अन्य कामांनाही सुरुवात झाली होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रचंड मेहनती आणि हुशार असतात. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहावे लागते. यूपीएससी, एमपीएससी यासह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हटले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात जावे लागते. मात्र, इच्छा असूनही अनेक विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मोठ्या शहरात जाणे शक्य होत नाही. त्यासाठी विकास मीना यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात अभ्यासिका असावी; जेणेकरून प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी बनण्याचे स्वप्न साकारता येईल. यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात १९ व दुसऱ्या टप्प्यात ३३ अशा एकूण ५२ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी अभ्यासिकांचे बांधकाम सुरू केले आहे.
त्या अनुषंगाने गुरुवारी झालेल्या बैठकीत सन २०२२-२३ मधील अभ्यासिकांचे काम जून अखेरपर्यंत, तर सन २०२३- २४ मध्ये मंजुरी दिलेल्या अभ्यासिकांची कामे डिसेंबर अखेरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना दिले आहेत. या बैठकीस पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत हे उपस्थित होते.