औरंगाबादेत महिला डॉक्टरांच्या एकीचा 'अभिनव पॅटर्न'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:04 AM2021-07-01T04:04:07+5:302021-07-01T04:04:07+5:30
राम शिनगारे औरंगाबाद : औरंगाबाद शहर मेडिकल हब म्हणून जगात ओळख निर्माण करीत आहे. या क्षेत्रातील पुरुष डॉक्टरांच्या तोडीस ...
राम शिनगारे
औरंगाबाद : औरंगाबाद शहर मेडिकल हब म्हणून जगात ओळख निर्माण करीत आहे. या क्षेत्रातील पुरुष डॉक्टरांच्या तोडीस तोड महिला डॉक्टर लक्षणीय कामगिरी नोंदवित आहेत. शहरात कार्य करीत असलेल्या किमान एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या महिला डॉक्टरांची संख्या ६००पेक्षा अधिक आहे. याशिवाय आयुर्वेदीक, दंतवैद्य महिला डॉक्टरांची संख्याही लक्षणीय आहे. यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) औरंगाबाद शाखेत महिला विंगमध्ये ६००पेक्षा अधिक महिला डॉक्टर कार्यरत आहेत. या सर्व महिला डॉक्टरांनी एकत्रितपणे एक स्वतंत्र नेटवर्क उभे केले आहे. या माध्यमातून समाजातील विविध घटकांना मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डॉक्टरी हे बुद्धिवंतांचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला आज कार्य करीत आहेत. हे कार्य करीत असताना महिलांना अनेकवेळा, अनेक ठिकाणी नेतृत्त्वाची संधी दिली जात नाही. त्यांना दुय्यम स्थान मिळते. पुरुषप्रधान संस्कृतीचाही यावर परिणाम होतो. यातून आयएमएच्या महाराष्ट्र शाखेने राज्यात महिला डॉक्टरांची स्वतंत्र ओळख असावी, त्यांना नेतृत्त्वाची संधी मिळाली पाहिजे. यासाठी आयएमएच्या अंतर्गत स्वतंत्र महिला विंग सुरू केली. या विंगची शाखा औरंगाबादेत आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या विंगच्या सद्यस्थितीत ६००पेक्षा अधिक सदस्य असल्याची माहिती विंगच्या अध्यक्ष डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी दिली. दोन वर्षांतच महिला डॉक्टरांनी शहरात भरीव काम केले आहे. सर्व महिला डॉक्टर संघटित झाल्यामुळे त्यांना अनेक कल्पना सुचत गेल्या. यातून महिलांमध्ये महिला डॉक्टरांनी एक चळवळ उभी केल्याचेही डॉ. दहिफळे सांगतात. महिला डॉक्टरांना पत्नी, सून, आई, मुलगी म्हणून वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. याशिवाय व्यवसायासोबतच सामाजिक दायित्वही निभावावे लागते. या सर्व गोष्टी करताना महिला डॉक्टरांना त्यांच्या क्षेत्रात अनेकवेळा डावलले जाते. दुय्यम स्थान मिळते. ही समाजाची, पुरुषप्रधान संस्कृतीची देण आहे. त्यावर मात करीत शहरातील महिला डॉक्टरांनी एकत्रित येत स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. एक मजबूत नेटवर्क उभे केले आहे. प्रत्येक आठ दिवसाला समाजासाठी, महिला डॉक्टरांसाठी दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात. कॅन्सरमुक्त महिलांची लाईफ स्टाईल, महिलांचे आजारांसह इतर महत्त्वाच्या बाबींवर समाजात जनजागृतीही करण्यात येत आहे. स्वसंरक्षण, मुलांना गुड टच बॅड टचचे प्रशिक्षण, वृद्धाश्रमांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत केली जात आहे. ज्या प्रमाणात पुरुष डॉक्टर कार्य करतात, त्यांच्या एक पाऊल पुढे टाकत महिला डॉक्टरांनी शहरातील समाजाच्या आरोग्यासाठी अधिक योगदान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही चळवळ अधिक प्रमाणात वाढेल, असा विश्वासही महिला डॉक्टरांच्या विंगच्या अध्यक्ष डॉ. उज्ज्वला दहिफळे व्यक्त करतात.
चौकट,
कोविड सेंटर उभारले
कोरोनाच्या काळात महिला डॉक्टरांनी पुरुष डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून कार्य केले. या कामाला तोड नाही. महिला विंगच्या माध्यमातून एक कोविड सेंटरही उभारले. या केंद्रात दोन महिन्यात ३००पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. यासाठी महिला डॉक्टर कार्यकारिणीच्या १६ सदस्यांनी योगदान दिल्याचेही डॉ. दहिफळे यांनी सांगितले.
कोट
येणाऱ्या काळात औरंगाबाद अधिक प्रमाणात विकसित होणार आहे. त्यात वैद्यकीय क्षेत्राचे मोठे योगदान असणार आहे. या वैद्यकीय क्षेत्राच्या योगदानात महिला डॉक्टर अग्रभागी असतील. महिला डॉक्टरांच्या गुणवत्ता आणि कर्तृत्त्वाला शहरात तोड नाही.
- डॉ. उज्ज्वला दहिफळे, अध्यक्षा, आयएमए महिला विंग, औरंगाबाद